महाड : अवास्तव अधिमूल्य तसेच भरमसाठ भाडे परवडत नसल्याने महाड नगरपरिषदेच्या मुख्य बाजारपेठेतील व्यापारी संकुलातील अनेक व्यापारी गाळे गेल्या पंधरा वर्षांपासून बंद अवस्थेतच आहेत. जादा अधिमूल्य तसेच भाडे परवडत नसल्याने नगरपरिषदेच्या निविदा प्रक्रियेत कोणीही सहभागी होत नाहीत. त्यामुळे नगरपरिषदेचे दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न बुडीत जात आहे.तत्कालीन नगराध्यक्ष सुधाकर सावंत यांच्या संकल्पनेतून मुख्य बाजारपेठेत मध्यवर्ती ठिकाणी केंद्र शासनाच्या एकात्मिक शहर विकास योजनेतून हे व्यापारी संकुल उभारण्यात आले होते. या इमारतीच्या तळमजल्यावरील व्यापारी गाळ्याचा लिलाव झाला, मात्र पहिल्या मजल्यावरील १२ गाळ्यांपैकी केवळ एकाच गाळ्याचा लिलाव झाला. येथील अन्य अकरा गाळे आजतागायत तसेच पडून आहेत. शासनाच्या नगरविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार या गाळ्याचे अधिमूल्य तसेच भाडे निश्चित करण्यात आल्याने त्यात फेरबदल करण्याचे अधिकारही नगरपरिषदेला नसल्याने त्याच नियमांना अनुसरून गाळ्यांच्या लिलावासाठी निविदा काढली, मात्र भरमसाठ अधिमूल्य व भाड्यामुळे कोणीही या निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे हे अकरा गाळे तसेच पडून आहेत.हे व्यापारी गाळे घेण्यास अनेक व्यापारी उत्सुक आहेत. मात्र अधिमूल्य व भाड्याबाबत नगरपरिषदेने थोडी शिथिलता आणावी, अशी त्यांची मागणी आहे. (वार्ताहर)या गाळ्यांचे अधिमूल्य व भाडे कमी करण्याबाबतचा प्रस्ताव नगरपरिषदेने प्रशासनाकडे पाठवला आहे. इ-लिलाव प्रक्रि येची कार्यवाही केली जाईल. इ-लिलाव न करता बोली पद्धतीने या गाळ्याची लिलाव प्रक्रिया करावी, अशा सूचना आल्या आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक आहे.- मच्छिंद्र घोलप, मुख्याधिकारी, नगरपरिषद
बाजारपेठेतील ११ गाळे पडले ओस
By admin | Updated: August 26, 2015 00:16 IST