पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पाबाबत केंद्र आणि राज्य शासन आकसाने वागत असल्याची टीका करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चार वर्षे सत्तेत असताना, मान्यता का दिली नाही, असा सवाल भारतीय जनता पक्षाने उपस्थित केला आहे. भाजपाचे प्रवक्ते उज्ज्वल केसकर यांनी पत्रकार परिषदेत हा प्रश्न उपस्थित करून चव्हाण यांच्या आरोपाचे खंडन केले आहे. पुणे आणि नागपूर मेट्रोचा प्रस्ताव एकाच वेळी पाठवूनही केंद्र सरकारने केवळ नागपूर मेट्रोला मंजुरी देऊन त्याचे भूमिपूजन केले; पण पुणे मेट्रो आकसाने मागे ठेवल्याचा आरोप चव्हाण यांनी गुरुवारी केला होता. त्यांच्या विधानाला आक्षेप घेत २०११ ते २०१४ पर्यंत राज्यात व केंद्रात यूपीएची सत्ता असतानाही पुण्याच्या मेट्रोला चव्हाण यांनी गती का दिली नाही, राज्याकडून वेगाने हालचाली होत नसल्याने अखेर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना मेट्रोबाबत पुढाकार घ्यावा लागली, याची आठवण करून द्यावी लागली, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. शिवसृष्टी, मेट्रो एका ठिकाणी कशी होणार?४कोथरूड येथील कचरा डेपोच्या जागेवर शिवसृष्टीच होईल, असा प्रस्ताव मुख्यसभेने मान्य केला आहे. त्यामुळे तेथील प्रस्तावित मेट्रो स्टेशनचे काय होणार, याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणीही केसकर यांनी केली. ४शिवसृष्टी आणि मेट्रोचे स्टेशन एकाच ठिकाणी होऊ शकणार नाही, असा स्पष्ट अभिप्राय दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) यापूर्वीच दिला असल्याकडे केसकर यांनी लक्ष वेधले.