पुणे : प्रकाशकांची भूमिका आम्हाला माध्यमांकरवी कळली. आम्हाला त्यांच्या बैठकीचे कोणतेच निमंत्रण देण्यात आलेले नाही किंवा ते आमच्याशी चर्चेलाही आले नाहीत. एकतर्फी भूमिकेतून प्रकाशक महामंडळ व संयोजन समितीवर आरोप करीत आहेत, जे अत्यंत चुकीचे आहेत. घुमानला पुस्तक विक्री कमी होईल, हे मान्य असले तरी प्रकाशकांकरिता सर्वतोपरी प्रयत्न करूनही ते माघार घेत नाहीत. त्यांची भूमिका अडेलतट्टूपणाची आहे.तरीही महामंडळ शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचे स्वागतच करेल, असे स्पष्टीकरण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी केला. साहित्य संमेलनावर प्रकाशकांनी बहिष्कार टाकल्यानंतर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या परिषदेला महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनील महाजन उपस्थित होते. वास्तविक साहित्य महामंडळ व प्रकाशक असे आम्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असून आमचेही एकमेकांशिवाय पटणार नाही. प्रत्येक संमेलनात लेखक आणि प्रकाशक यांचा सन्मान करण्याची रीत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद व चार घटकसंस्था यांच्याकडून प्रकाशक व लेखकांना ३५ वार्षिक पुरस्कार प्रदान केले जातात. प्रकाशकांबरोबर एवढा सन्मवय असतानाही त्यांनी त्यांच्या भूमिकेचा विचार करावा, असेही वैद्य यांनी स्पष्ट केले.वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवूनही जर प्रकाशक त्यांच्या अटींवर अडून बसणार असतील तर संयोजकांनी आणखी काय करायचे? असा सवाल सुनील महाजन यांनी या वेळी उपस्थित केला. (प्रतिनिधी)४डॉ.वैद्य म्हणाल्या की, साहित्य संमेलन हे सर्वसमावेशक असावे अशी महामंडळाची आजही भूमिका आहे. यापूर्वी बडोदा आणि इंदूरमध्येही संमेलने झालेली आहेत. प्रकाशकांकरिता केवळ १५०० रुपयांत रेल्वेचा प्रवास, यात दोन्ही वेळचे जेवण तसेच पुस्तकांसाठी एक स्वतंत्र बोगी, तसेच साहित्य संमेलनाच्या इतिहासातील पुस्तकं. स्टॉलकरिता सर्वात कमी ११०० भाडे असतानाही प्रकाशक घुमानकडे पाठ फिरवीत आहेत. महामंडळाने आपला मान राखला नसल्याचे प्रकाशकांचे म्हणणे आहे. तर प्रकाशकांचा सन्मान राखण्यात महामंडळ कुठेही कमी पडले नाही.
प्रकाशकांचे स्वागतच करू
By admin | Updated: February 4, 2015 00:36 IST