लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोना काळात रोगप्रतिकारकशक्तीचे, पोषक तत्त्वांचे महत्त्व प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे. शरीराला जास्तीत जास्त पोषक तत्त्वे मिळावीत, यासाठी सप्लिमेंट, गोळ्या यांचे सेवन करण्याचा ट्रेंडच आला आहे. शरीराचे व्यवस्थित पोषण होण्यासाठी नैसर्गिक आहारच योग्य ठरतो. फळे, भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये यांचे सेवन महत्त्वाचे ठरते. सप्लिमेंट ही नैसर्गिक आहाराला पूरक म्हणून वापरली जातात. त्यामुळे डॉक्टरांच्या, आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय स्वत:च्या मनाने सप्लिमेंटचे सेवन केल्याने शरीराला अपाय होऊ शकतो.
आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर म्हणाल्या, “सप्लिमेंट पाण्यात विरघळणारे असतील तर त्याचा शरीराला अपाय होत नाही. त्यातून शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे शोषली जातात आणि जादाची मूत्राद्वारे बाहेर फेकली जातात. मात्र, झिंक, आयर्न अशी मिनरल असलेल्या गोळ्या आपल्या मनाने घेणे योग्य नाही. कारण, त्याचा यकृतावर विपरित परिणाम होऊ शकतो. कारण, मिनरल्सचा लवकर निचरा होत नाही. ई, डी, ए, के ही जीवनसत्त्वे फॅट सोल्युबल असतात. त्यामुळे ती शरीरात साठून राहतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या सप्लिमेंटचे सेवन केल्याने शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो. आपल्या शरीराला याची खरंच गरज आहे का, याचा विचार केला जात नाही.”
प्रोटिन सप्लिमेंटचा ट्रेंड सध्या खूप वाढला आहे. एखादी जाहिरात पाहून औषध विक्रेत्यांकडील प्रोटिन सप्लिमेंट घेण्यावर भर दिला जातो. बऱ्याच सप्लिमेंटमध्ये ६० टक्के कर्बोदके आणि १०-१५ टक्के प्रथिने असतात. यातून शरीराला प्रथिने कमी प्रमाणात आणि कॅलरी जास्त प्रमाणात मिळतात. त्यामुळे वजनही वाढू शकते. पैसा, वेळ वाया जाण्याची शक्यता असते. आहारातून किती प्रथिने मिळतात आणि सप्लिमेंटची किती गरज आहे, यात सुसूत्रता असावी लागते. प्रथिने अतिरिक्त प्रमाणात घेतल्यास त्याचा मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो. वय, आजारांची पार्श्वभूमी, व्यायाम प्रकार यांचा विचार करून प्रोटिन सप्लिमेंट ठरवली जातात.
चौकट
“शरीरासाठी दररोज ४०-५० प्रकारची पोषक तत्त्वे आवश्यक असतात. रुग्णांची तपासणी करताना डॉक्टरांकडून त्यांच्या आहाराच्या सवयी जाणून घेतल्या जातात. त्यातून त्यांना नेमक्या कोणत्या पोषक घटकांची कमतरता भासते आहे, हे लक्षात येते. बी १२, डी ३ अशा घटकांची कमतरता असेल तर त्यानुसार सप्लिमेंटची गरज आणि प्रमाण ठरवले जाते. आतड्यांमधील चांगल्या जीवजंतूंचे प्रमाण कमी झाल्याने बी १२ चे व्यवस्थित शोषण होत नाही. त्यामुळे बरेचदा बी १२ साठी सप्लिमेंट वापरावे लागतात. डी ३ केवळ सूर्यप्रकाशातून मिळते. आहारातील त्याचे प्रमाण वाढवण्यासाठी सप्लिमेंट दिल्या जातात. हिमोग्लोबीन कमी असल्यास आहारातून वाढवणे शक्य असते, मात्र त्याला वेळ लागतो. आहारातील सर्व लोह शरीरात शोषले जात नाही. त्यातील काही टक्केच शरीराला मिळते. अशा वेळी सप्लिमेंटची गरज भासते.”
- अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ