----------
ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. मात्र, त्यांना संधी मिळत नाही. संधी मिळाली तरी त्यांना शहरात येऊन राहणे किंवा घरातून रोज शहरात येऊन-जाऊन एखादी गोष्ट शिकणे प्रचंड वेळखाऊ आणि खर्चिक असते, त्यामुळे ग्रामीण भागात जाऊन विद्यार्थ्यांना शिकविणे आणि ग्रामीण भारतातील ब्राइट इंडियाला शाइन करणे या उद्देशाने जिनिअस टॅलेंट सर्च ही परीक्षा मी सुरू केली आणि त्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक हिरे सापडले. जे आज विविध स्पर्धा परीक्षा आणि मेडिकल इंजिनिअरिंगच्या स्पर्धा सहज क्रॅक करीत आहेत.
मायक्रोबायोलॉजीमध्ये एमएस्सी केल्यावर मी एनसीएलसारख्या महत्त्वाच्या संस्थेत संशोधन केले. बारा-बारा तास सबमिनस बॅक्टेरिया यासारख्या विषयावर संसोधन केले. त्यानंतर मला जाणवले की, या क्षेत्रात संशोधन करणाऱ्यांची संख्या खूपच आहे किंवा इथपर्यंत येण्याची इच्छा अनेकांची आहे. मात्र, त्यांना शालेय जीवनातच योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांच्या आयुष्याची गाडीच चुकते. त्यामुळे संशोधनाच्या कामाला मी विराम देत अध्यापनाच्या कार्याचा श्रीगणेशा केला. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तिसरी-चौथीपासूनच सुरुवात व्हावी या उद्देशाने मी ग्रामीण भागातील मुलांसाठी २०१५ मध्ये जिनिअस टॅलेंट सर्च परीक्षा सुरू केली. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यामुळे मग लवासा येथे एक घर रेंटने घेतले आणि शाळकरी मुलांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी या दृष्टीने शिक्षणाला सुरुवात केली. शाळकरी मुलांना स्पर्धा परीक्षेचे शिक्षण ही गोष्ट तशी पालकांना सहज पचनी पडणारी नव्हती, त्यामुळे पहिल्या वर्षी एकाच मुलाचा माझ्या शाळेमध्ये प्रवेश झाला. मात्र, निराश न होता आम्ही त्यावर मेहनत घ्यायला सुरूवात केली. त्या मुलाची वर्षात झालेली प्रगती आणि लेखन-वाचनासह अवांतर ज्ञानामुळे परिसरातील पालक अवाक् झाले, त्याशिवाय आम्ही घरोघरी जाऊन पालकांना ‘स्पर्धा परीक्षांबाबत’ आणि ‘मुलांचे मानसशसात्र’ या विषयावर समजावून सांगायला सुरुवात केली. शाळेमध्ये लहान मुलांच्या मानसशास्त्रापासून ते अभ्यास कसा घ्यावा इथपर्यंत अनेक सेमिनार घेतले आणि मग या गोष्टी पालकांना समजायला लागल्या आणि एका मुलीच्या प्रवेशावरून दोन-तीन वर्षांत ७० मुलांचा प्रवेश या शाळेत झाला. प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी, युकेजी अशा वयोगटात मुलांना हसत-खेळत विविध गोष्टी शिकविण्यास सुरुवात केली आणि त्याला उत्तम यश मिळाले.
कोविडच्या काळात दुर्दैवाने शाळा बंद ठेवावी लागली. मात्र, कोविडमुळे प्रचंड वेगात पुढे आलेले ऑनलाइन शिक्षण ही एक नवी संधी मला वाटते. त्यामुळे मी आता ऑनलाइन शिक्षणासाठी नवनव्या मोबाइल ॲपवर काम करायला सुरुवात केली. मुलांच्या बुद्धीला चालना मिळावी आणि त्यांना रंजक, रोचक पद्धतीने अभ्यासासह इतर अवांतर गोष्टींचे ज्ञान मिळावे, विद्यार्थी परीक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बनावेत यासाठी छोट्या-छोट्या ॲपची निर्मिती सुरू आहे.
याशिवाय बुक्स इंटेलिजन्सच्या माध्यमातून स्टडी मेटेरिअलनिर्मितीचेही काम सुरू आहे. ज्याचा वापर करून मेडिकल शाखेची प्रवेश परीक्षा अर्थात नीटसारख्या परीक्षांमध्ये गेल्या दोन वर्षांत अनेक विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळविले आहे. नीटसाठी अनेक क्रॅश कोर्स घेण्याचे काम सुरू होते, त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. त्यातूनही मुलांच्या टॅलेंट सर्चचा विषय पुढे आला होता. या साऱ्याच कामाची व्याप्ती वाढत असून, ही सर्व कामे डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम सुरू आहे.
(शब्दांकन : दीपक होमकर)