याबाबत स्टेट बँकेच्या मॅनेजर वंदना पांडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंचर शहराच्या गजबजलेल्या भागात पुणे नाशिक महामार्गालगत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेच्या बाहेरील बाजूस एक एटीएम मशीन, एक कॅश डिपॉझिट मशीन व एक पासबुक प्रिंटिंग मशीन असे तीन मशीन आहेत. आज पहाटे ३:३० ते ३:४० च्या दरम्यान सहा चोरट्यांनी कॅश डिपॉझिट मशीन कशाच्या तरी साह्याने टेम्पोला बांधून बाहेर ओढत आणले आहे. हे मशीन टेम्पोत टाकून काही क्षणांत चोरटे पळून गेले आहेत. मशीनमध्ये १६ लाख ५३ हजार ८०० रुपये किमतीच्या नोटा होत्या. त्यामध्ये ५०० रुपये किमतीच्या २८०२ नोटा, दोनशे रुपये किमतीच्या ७२६ नोटा, शंभर रुपये किमतीच्या ६१६ नोटा असा ऐवज चोरट्यांनी पळवला आहे. त्याचबरोबर ५० हजार रुपये किमतीचे कॅश डिपॉझिट मशीन चोरट्यांनी पळवले आहे. एकूण १९ लाख ३८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. दोन महिन्यांपूर्वी देखील मंचर शहरातील मुळेवाडी रस्त्यावरील भर वस्तीतील ॲक्सिस बँकेचे एटीएम मशीन स्कार्पिओ गाडीच्या साह्याने ओढत नेऊन लंपास केले होते. अजून याच गोष्टीचा तपास लागला नसून आता स्टेट बँकेचे मशीन चोरट्यांनी पळविले आहे. मंचर शहरात एकूण आठ एटीएम सेंटर असून, त्यापैकी बहुतांश एटीएम सेंटर हे रामभरोसे आहेत. शहरातील फक्त दोन ते तीन एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षकांची नेमणूक केलेली आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक सागर खबाले यांनी पहाटेपासून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपींना शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत.
मंचरच्या स्टेट बँकेतील कॅश डिपॉझिट मशीनची चोरी,१८ लाख ५३ हजार लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST