वाकड : मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी स्वत:च्या घरासह पोलिसाच्या घरावर डल्ला मारणाऱ्या व्यसनी इंजिनियरला वाकड पोलिसांनी सापळा रचून गजाआड केले. त्याच्याकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघड करीत दोन लाख २४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सूरज भीमराज सुद्रिके (वय २०, रा. वेणूनगर, वाकड) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून एक लाख ७४ हजार रुपये किमतीचे ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने व ५० हजार रोख असा एकूण २ लाख २४ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला केला आहे. हे दागिने त्याने घरात आणि काही गहाण ठेवले होते. आरोपीने गेल्या वर्षी स्वत:च्याच घरी हात मारला होता. याप्रकरणी त्याचे वडील भीमराज सुद्रिके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होता. आठवड्यापूर्वी पोलीस लाइनमध्ये राहणारे आणि सांगवी ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस नाईक केंगले यांच्या घरी त्याने घरफोडी केली होती. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी दिलेली माहिती अशी - वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्ह्यांस प्रतिबंध व्हावा म्हणून तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, तुकाराम फड व कर्मचाऱ्यांची गस्त सुरु असताना पोलीस शिपाई श्याम बाबा यांना खास बातमीदारांमार्फत खात्रीशीर माहिती मिळाली, की कावेरीनगर आणि पोलीस लाईनमध्ये घरफोड्या करणारा काळाखडक येथील चंद्रमाऊली गार्डन कार्यालयाजवळ थांबला आहे. त्यानुसार बालाजी पांढरे स्टाफसह दाखल झाले. मिळालेल्या वर्णनाची व्यक्ती दिसल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, वरील गुन्हे त्याने केल्याची कबुली दिली. श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक कल्याण पांढरे, हनुमंत राजगे, अशोक दुधवणे, बिभीषण कन्हेरकर, विक्रांत गायकवाड, गणेश हजारे, नवीन गायकवाड, बापू धुमाळ, सागर सूर्यवंशी, हेमंत हांगे व मोहिनी थोपटे यांच्या पथकाने कारवाई केली. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
चोरीप्रकरणी अभियंता अटकेत
By admin | Updated: March 29, 2017 02:15 IST