पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) १४ मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा अचानक पुढे ढकलल्याने विद्यार्थी संतापले आहेत. ठरलेल्या तारखेलाच परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच, राज्य सरकारच्या सांगण्यावरून एमपीएसीने निर्णय घेतल्याने राज्य सरकाराला परीक्षा घेण्याची इच्छा नाही, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे सरकारवर आता विश्वासच राहिला नाही अशी भावना विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
कोट
विद्यार्थ्यांनी किती संयम ठेवावा याला मर्यादा आहेत. आर्थिक अडचणीत आम्ही सापडलो आहोत. परीक्षा वारंवार पुढे ढकलल्या जाणार असतील, तर किती काळ अभ्यास कारायचा हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे.
-धैर्यशील शिंदे
कोट
परीक्षा वेळेतच घ्याव्यात. परीक्षेची तारीख जाहीर होते. आम्ही अभ्यास करतो, दोन दिवस राहिले की रद्द होते. हा खेळ खेळायला राज्य सरकारला मजा येत आहे. मात्र, याची सजा आम्हाला भोगावी लागत आहे.
-प्रथमेश खैरे
कोट
राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करता यावा, म्हणून मी बँकेच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे, असे निर्णय घेऊन सरकार धक्का देत आहे. आता नेमके काय करावे हे समजत नाही. कोरोना काळातही केवळ अभ्यासासाठी पुण्यात राहिलो.
- अमित येवले
कोट
कोरोनाने मेलो तरी चालेल, पण परीक्षा पुढे ढकलण्याच्या धक्क्यामुळे मरण येऊ नये असे वाटते. आरोग्य विभागाची परीक्षा होते. यूपीएससी परीक्षा घेऊ शकते, निवडणुका होऊ शाकतात. मात्र, फक्त एमपीएसीच्या परीक्षा होऊ शकत नाहीत. परीक्षा आली की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो. अजब सरकार आहे.
- संदीप जाधव
कोट
परीक्षा घेणार नसाल तर तसे एकदाचे जाहीर करा. म्हणजे दुसरा मार्ग निवडता येईल. एमपीएसीसी आणि राज्य सरकारकडून आमचा छळ सुरू आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही केवळ अभ्यासासाठी पुण्यात राहिलो आहोत.
- ज्योत्स्ना शिंदे
कोट
परीक्षा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा आहे. दोन वर्षांपासून अभ्यास करतो आहोत. खूप ताण वाढलेला आहे. कृपा करून याचे राजकारण करू नये. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये.
-पूजा ढास
कोट
मराठा आरक्षणाच्या लढाईत परीक्षा अडकल्या आहेत. केवळ कोरोनाचे कारण देऊन परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे. सरकारने परीक्षा ठरलेल्या तारखलेचा घ्यावी.
-किरण पुरी
कोट
राज्य सरकारला एमपीएससीची परीक्षा होऊ द्यायची नाही. केवळ राजकारण केले जात आहे. आरक्षणाचा मुद्दा सोडविता येत नाही. म्हणूच एमपीएसीसी विद्यार्थ्याना वेठीस धरले जात आहे.
- सोनाली गायकवाड
कोट
कोरोनामुळे आईवडील अभ्यासासाठी पाठवत नव्हते. कसेबसे समजूत काढून यावेळी परीक्षा नक्की होणार आहे असे सांगिलते होते. मात्र, या निर्णयाने धक्का बसला आहे. घरी काय उत्तर द्यावे, हा प्रश्न पडला आहे. राजकारणाचे बळी विद्यार्थी ठरणार असतील, तर तरुणांचे भविष्य कसे उज्ज्वल होणार आहे.
- निशा धनू
कोट
सगळे सुरळीत असताना कोरोना फक्त एमपीएसीसीच्या परीक्षांमध्ये आड येतोय असे सरकारला वाटते आहे. केवळ हवेत गप्पा मारायच्या, कृती मात्र शून्य अशी अवस्था या सरकारची झाली आहे. फेसबुकवर लाईव्ह येऊन माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. मात्र तुमचा (जनतेचा) आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही. असे मुख्यमंत्री म्हणाले होते, यावरून त्यांना किती विद्यार्थ्यांच्या भावना समजणार हा प्रश्नच आहे.
- अभिजित गोरे
---
विद्यार्थी संघटनांच्या प्रतिक्रिया
अनेक वेळा ही परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा स्थगित केलेली आहे. योग्य तो निर्णय घेऊन, परीक्षा ठरलेल्या तारखेला घेण्यात यावी, अन्यथा आम्ही पुण्यातील शास्त्री रोडवर सामुदायिक आत्मदहन करू. परीक्षा रद्द करण्याची वेळ सरकार आणि एमपीएसीसीच्या अकार्यक्षमतेमुळे आली आहे.
- कल्पेश यादव, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
---
कोरोनामुळे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पुढे ढकलली होत. परंतु, जानेवारी महिन्यात १४ मार्चची तारीख जाहीर केल्यामुळे लाखो विद्यार्थी पूर्णवेळ तयारी करत आहेत. सर्व सुरळीत सुरू असताना कोरोनाचे कारण देऊन अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काहीही साध्य होणार नाही. विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेता सरकारने यावर तातडीने फेरविचार करून निर्णय घ्यावा.
- अक्षय जैन, सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
---
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली हे मान्य आहे. सर्वकाही अलबेल चाललेय असा आमचा मुळीच दावा नाही. शासकीय नोकरीची आधीच वणवण असताना त्यात बेरोजगारीत वाढ आहे. त्यात परीक्षा रद्द करुन त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू आहे. नकटीच्या लग्नास सतरा विघ्नं, तशी अवस्था या विद्यार्थ्यांची झाली आहे.
- कुलदीप आंबेकर, अध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हँड