शिक्रापूर (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीत एक जागा बिनविरोध निवडून आली. त्यानंतर सोळा जागांसाठी निवडणूक होत असताना माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या गटाला सात जागा मिळाल्या आणि त्यांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर सरपंचपदाचे आज झालेल्या आरक्षणमध्ये अनुसूचित जाती जमातीचा सरपंच असे आरक्षण जाहीर झाले. तर या आरक्षणानुसार गावातून रमेश गडदे ही एकच व्यक्ती निवडून आलेली असून ते बांदल गटाचे सदस्य आहे. त्यामुळे शिक्रापूर ग्रामपंचायतीवर अखेर बांदल गटाच्याच सरपंचांचा झेंडा फडकणार हे काहीसे निश्चित झाले आहे.
शिक्रापूर येथे ग्रामपंचायत निवडणूक होत असताना माजी सरपंच बापूसाहेब जकाते, आबासाहेब करंजे, बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे, बाबासाहेब सासवडे, सोमनाथ भुजबळ, अरुण करंजे यांनी माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या पॅनलच्या विरोधात पॅनल टाकून बांदल यांचा पुतण्या निखिल बांदल सह बांदल यांचे खंदे समर्थक रामभाऊ सासवडे यांचा पराभव करुन ही निवडणूक ९ विरुद्ध ७ अशी जिंकली. एक उमेदवार बिनविरोध असल्याने तो कुणाकडेही जाण्याची शक्यता गृहीत धरली तरी ग्रामपंचायतीवर बांदल यांच्या विरोधी गटाचीच सत्ता येणार असे चित्र होते. मात्र, शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी जाहीर केलेल्या सरपंच आरक्षणाला स्थगित करुन आरक्षण सोडती पुन्हा करण्याचे निश्चित झाले होते. औरंगाबाद खंडपीठापुढे अनुसुचित जाती जमातीची पडलेली आरक्षणे तशीच ठेवावीत व इतर आरक्षणे पुन्हा करावीत, असा आदेश एका याचिकेवरील निर्णयानुसार खंडपीठाने दिला आणि याच निर्णयानुसार शासनाला कार्यवाही करणे आज भाग पडले. पर्यायाने आज शिरुर तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडत कार्यक्रमावेळी शिक्रापूरचे आरक्षण पूर्वी ठरल्याप्रमाणे होईल, असे जाहीर करण्यात आले.