पुणे: इयत्ता अकरावी-बारावीनंतर अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याऐवजी पॉलिटेक्निकनंतर अभियांत्रिकी पदवीच्या थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्याचा मार्ग खुला आहे. तसेच, पॉलिटेक्निक पूर्ण केल्यानंतर सहज नोकरी उपलब्ध होत आहे. त्यामुळे पॉलिटेक्निकला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यंदा पुणे विभागातील २७ हजार ८०० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोजगारभिमुख अभ्यासक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी इयत्ता अकरावीला प्रवेश घेण्याऐवजी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमास प्रवेश घेत असल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी पॉलिटेक्निक अभ्यासक्रमास २१ हजार १७७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यंदा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत २७ हजारांपर्यंत वाढ झाली आहे. पुणे विभागात १५ हजार ४१६ जागा असून, त्यासाठी १० हजार ८३० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.
---------------
पॉलिटेक्निक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून पॉलिटेक्निकला पसंती दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यंदाही प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगली आहे.
- महेश जोशी, प्राचार्य, पॉलिटेक्निक कॉलेज
---------------------
इयत्ता दहावीचा निकाल वाढल्यामुळे यंदा पॉलिटेक्निक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निकनंतर रोजगाराच्या संधी आहेत. तसेच, पॉलिटेक्निकनंतर विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेशिवाय अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षास प्रवेश मिळतो. त्यामुळे अनेक विद्यार्थी अकरावी-बारावीऐवजी पॉलिटेक्निकचा पर्याय निवडत आहेत.
- रवींद्र उत्तेकर, प्राचार्य पॉलिटेक्निक कॉलेज,
--------------------------
दोन वर्षे विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम शिकण्याऐवजी पॉलिटेक्निकला प्रवेश घेतल्यास अभियांत्रिकी अभ्यासक्रमाशी निगडित असणारा अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळते. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमास थेट द्वितीय वर्षास प्रवेश घेतल्यानंतर अभ्यास अवघड वाटत नाही. तसेच एकावेळी दोन पदव्या घेऊन नोकरी मिळवण्याचे पर्याय खुले होतात.
- ईशिता काटे, विद्यार्थी
--------------------------------------
जिल्हा संस्था प्रवेश क्षमता प्रवेशास प्राप्त अर्ज
पुणे ४१ १५,४१६ १०,८३०
कोल्हापूर २० ७,८३० ५,६७९
सांगली १६ ४,६३० २,८२६
सातारा १४ ३,७९२ ३,०१०
सोलापूर २१ ६,४७६ ५,४५५
-----------------------------------------------