कांदळी येथील उंबरकासमळा येथे गुरुवारी (दि २७) सायंकाळी ६ च्या सुमारास उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटारसायकलचा पाठलाग करुन मोटारसायकलवरुन जाणाऱ्या दोघाजणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते दोघेजण सुखरुप बचावले होते. या घटनेनंतर वनखात्याने गुरूवारी सांयकाळी मारूती बाळशिराम रेपाळे यांच्या शेतात तत्काळ पिंजरा लावला होता. शुक्रवारी (दि २९) सकाळी १०.३० च्या सुमारास साधारणता अडीच ते तीन वर्षे वय असलेली बिबट्याची मादी वनखात्याने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे वनक्षेत्रपाल देशमुख यांनी सांगितले.
या परिसरात अजूनही एक बिबट्या आणि दोन बछडे आहेत. वनखात्याने या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ सोमनाथ रेपाळे, संदीप रेपाळे, सतीश कुरळे, मंगेश रोकडे, मंगेश रेपाळे, गणेश घाडगे, सौरभ रेपाळे, शांताराम रेपाळे आदी ग्रामस्थांनी केली आहे.