निमोणे : परिसरामध्ये सध्या रब्बी हंगामातील कांद्याची काढणी चालू आहे. सलग दुसऱ्या वर्षीही बाजारभाव नसल्याने कांदा शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे.सध्या रब्बी हंगामातील कांदाकाढणी चालू आहे. मात्र, गतवर्षीप्रमाणे याही वर्षी कांद्याला प्रतिकिलो ३ते ७ रुपये बाजारभाव मिळत असल्याने आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी अशीच स्थिती असल्याने गतवर्षीचेच कर्ज डोईवर असताना आणखी कर्जाचा नवा डोंगर उभा राहतो आहे. मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने, आजारपण, घरखर्चाबरोबरच बँका व सावकारांची देणी द्यावयाची तरी कशी, हा यक्षप्रश्न कायम आहे. कांद्याबरोबरच अन्य तरकारी मालासही मातीमोल भाव मिळत असल्याने पिके घ्यावीत तरी कोणती, असाही बळीराजाचा सवाल आहे. सतत दोन वर्षे कांदा शेतकऱ्यांना रडवत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याची अवस्था विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांपेक्षाही बिकट झाली असून बळीराजाचे पुरते कंबरडे मोडले आहे. (वार्ताहर)कांदा उत्पादन खर्चिक व किचकट झाले आहे. एकरी खर्च नांगरट-२०००/-,पाळी - १०००/-, सारे पाडणे - ८००/-, रोपे-५०००/-, लागवड- ५०००/-, खुरपणी - २०००/-,खते-१०,०००/-, औषधे-२५००/-,काढणी-७०००/-,विजबिल -१०००/-, पाणी-३०००/-, बारदाणा-६०००/-, वाहतूक-८०००/-, हमाली-तोलाई-१५००/-.- असा साधारण कमीत कमी एकरी -५०,००० ते ५५, ००० रुपये खर्च येतो. शेतकरी रात्रंदिवस बायको मुलांसह शेतात राबतो याचा खर्च नाही. या एक एकर शेतीतून साधारण २०० (दोनशे) पिशवी म्हणजे दहा टन माल निघतो. शिवाय सर्व मालाची प्रतवारी सारखी नसते. फुट चिंगळी, गोलटी व मोठा कांदा असा माल निघतो. त्यामुळे प्रतवारीनुसार बाजारभाव मिळतो. सध्याच्या बाजारभावानुसार सरासरी ३ ते ७ रुपये प्रतिकिलोनुसार भाव मिळाल्यास उत्पादनखर्चही भागत नाही. एवढे कष्ट करूनही शेतकऱ्याच्या पदरी दमडीही पडत नाही. रस्त्यावर उतरावे लागेलकांद्यास एक रुपया प्रतिकिलो बाजारभाव ही बळीराजाची घोर थट्टा असून हे कुठेतरी थांबावे, अन्यथा शेतकऱ्यांस नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल, असाही इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.कांदा काढणीचा साधा खर्चही निघत नसल्याने या वर्षी दोन एकर कांद्यात नाईलाजाने बकऱ्या सोडल्या.- सुनील बांदल, करडे (कांदा उत्पादक)नीचांकी भावामुळे उत्पादन खर्चही भागात नसल्याने शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे.- नवनाथ गव्हाणे, निमोणे, कांदा उत्पादक ‘शासनाने या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी त्वरित निर्यात सुरू करावी व उत्पादनावर अनुदान द्यावे.- एकनाथ वाळुंज, शिंदोडी, कांदा उत्पादक कांद्याच्या कमी बाजारभावामुळे कांदा बियाणे व रोपे यांची विक्री पंच्याहत्तर टक्क्यांनी घटली. तयार रोपांमध्ये शेळ्यामेंढ्या सोडण्याची वेळ आली.-श्रीधर साळुंके, निमोणे, कांदा बियाणे व रोपे उत्पादक
दुसऱ्या वर्षीही कांदा रडवतोय!
By admin | Updated: March 10, 2017 04:49 IST