पुणो : शारदाबाई पवार मुलींचे वसतिगृह नेमके कोणत्या ठिकाणी होणार, त्यावरून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत एकवाक्यता नाही. वसतिगृह हडपसर की वारजे, यावरून दुफळी निर्माण झाली आहे. तर, मनसेकडून वसतिगृहाची जागा बदलण्यास विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असूनही प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला.
महापालिकेच्या 2क्14-15 च्या अर्थसंकल्पात घोले रस्त्यावर शारदाबाई पवार वसतिगृह उभारण्यासाठी 2 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे, त्याच धर्तीवर शहरात विविध जिल्ह्यांतून शिक्षणासाठी येणा:या मुलींना वसतिगृह उभारण्याची योजना तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी मांडली होती. मध्यवर्ती भागात गरवारे, फग्यरुसन, मॉडर्न कॉलेज आहेत. त्यामुळे घोले रस्त्यावरील प्रिंटिंग प्रेसच्या मोकळ्या जागेत वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र, घोले रस्त्यावरील जागा वसतिगृहासाठी पुरेशी नाही. त्यामुळे महापौर चंचला कोद्रे यांनी हडपसर-मुंढवा भागातील आरक्षित जागेवर वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, नगरसेवक सचिन दोडके यांनी वारजे येथे वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव दिला. त्यावर एकमत झालेले नाही.
त्यावर मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी घोले रस्त्यावरून प्रस्तावित मुलींचे वसतिगृह स्थलांतरित करण्यास विरोध केला. स्थायी समितीत एकमत होत नसल्याने शारदाबाई पवार मुलींचे वसतिगृह उभारण्याचा प्रस्ताव पुढे ढकलण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढावली.
शारदाबाई पवार मुलींच्या वसतिगृहासाठी घोले रस्त्यावर पुरेशी जागा नाही. त्यामुळे हडपसर अथवा वारजे अशा कोणत्याही एक ठिकाणी वसतिगृह उभारण्याची आमची तयारी आहे.
- चंचला कोद्रे, महापौर.