- सुवर्णा गवारे-नवले, पिंपरीबाबा, नका ना मला सोडून जाऊ..., आई लवकर ये ना परत..., मला तुझी फार आठवण येते..., निरागस बालकांचे रडणे असे काहीसे वातावरण शहरातील विविध भागांत पाहायला मिळते. बेरोजगारांसाठी पाळणाघर हा उत्पन्नाचा नवा व्यवसाय झाला आहे. त्यामुळे पाळणाघरांची संख्या वाढली आहे. धकाधकीच्या जीवनात पाळणाघरे ही पालकांसाठी सोईस्कर आहेत, अशा प्रतिक्रिया पालकांनी दिल्या. पण बालकांच्या आरोग्यावर त्याचा दूरगामी परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी पती-पत्नी दोघेही नोकरीसाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे मुलाचे काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यासाठी पाळणाघराचा पर्याय त्यांनी शोधला आहे. फ्लॅट, दोन रूमच्या खोल्यांमध्ये पाळणाघरे सुरूआहेत. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने ही बालके सुदृढ होत नाहीत. या बाबींकडे मात्र पालकांचे दुर्लक्ष होत आहे. ज्या वयात बालकाला योग्य संस्कार व आहाराची गरज असते, त्या वयातच ही बालके घरापासून दुरावली जातात. यामुळे मुलांचे मानसिक खच्चीकरण होते. मुले अबोल बनतात. हा कालावधी बौद्धिक विकासाचा असतो, असे आहारतज्ज्ञ डॉ. राम गुडगिला यांनी सांगितले.सकाळच्या वेळी मुले पाळणाघरात सोडली जात आहेत. सोबत खाण्यापिण्यासाठी मुलांना डबा दिला जातो. काही वेळा मुलांना स्वयंपाक बनवून देणे शक्य नसल्याने त्यांना पाळणाघरातील आया खाऊ तयार करून देतात. पाळणाघरात मुलांची संख्या जास्त असल्याने त्यांच्या आहाराकडे व्यवस्थापकांना लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे मुलाची वाढ खुंटली आहे की, कुपोषणात्मक दृष्टीने काही समस्या मुलांच्या आहेत, अशा बाबींकडे कुटुंबीयाचे लक्ष असते. यामुळे अशा मुलांचा सांभाळ करणे अवघड होते. पाळणाघरात मूल तासावर ठेवण्याचेही पैसे घेतले जातात. काही ठिकाणी २००, तर काही ठिकाणी ५०० रुपये शुल्क आहे. तर काही पाळणाघरांचे मासिक शुल्क ५ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत आहेत. पाळणाघरात अगदी ६ महिन्यांपासून ते १२ वर्षांपर्यंतची मुले ठेवली जातात. पाळणाघरे ही फक्त मूल सांभाळणे व त्याची सुरक्षेची जबाबदारी घेणे एवढ्यापुरतीच मर्यादित आहेत. यापुढे जाऊन पाळणाघरात मनोरंजनाच्या दृष्टीने कोणतेही साधन नसते. शहरस्तरावर महापालिके चे एकही पाळणाघर नाही. पाळणाघरासाठी आलेल्या अर्जांपैकी एकही अर्ज पात्र ठरला नसल्यामुळे शासकीय पाळणाघरे शहरात नाहीत. नोकरी करीत असलेल्या पाच वर्षे वयाच्या आतील बालकांसाठी पाळणाघराची सुविधा आहे. बचत गट अथवा नोंदणीकृत संस्था तीन वर्षे कार्यरत असणे आवश्यक आहे. किमान १५ बालके असणे आवश्यक आहे. विक्रीकर नंबर असलेले कोटेशन सादर केल्यानंतर १० हजार रुपये व इतर सुविधांसाठी १२ हजार रुपये सहा महिन्यांच्या टप्प्यावर दिले जातात.- संभाजी ऐवले, समाजविकास अधिकारी पाळणाघरे ही मुलांचा सांभाळ करण्यापुरती झाली आहेत. मुलांच्या आहाराकडे, शाळापूर्व शिक्षणाचा पाळणाघराशी काही संबंध नाही. पाळणाघर अर्थार्जनाचे साधन बनले आहे. शहरातील पाळणेघरे नोंदणीकृत नाहीत. शहरात दर्जेदार पाळणाघरे निर्माण होण्याची गरज आहे. - अच्युत बोरगावकर, अध्यक्ष, तथापि संस्था
आई, नको ना सोडून जाऊस मला!
By admin | Updated: September 11, 2015 04:42 IST