पुणे : देशभरातील स्मार्ट सिटी योजनेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्याच्या निमंत्रण पत्रिकेतून महापौर प्रशांत जगताप यांचेच नाव वगळण्याचा धक्कादायक प्रताप उजेडात आला आहे. महापालिकेचा एक प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमातून महापौरांचेच नाव वगळण्यात आल्याने केवळ महापौरांचाच नाही, तर संपूर्ण शहराचा अपमान झाल्याची भावना महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, नगरविकास मंत्रालयाने ही कार्यक्रम पत्रिका तयार केली असल्याचे सांगून प्रशासनाने केंद्राकडे बोट दाखविले आहे.बालेवाडी-म्हाळुंगे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी पुणे स्मार्ट सिटीच्या १४ प्रकल्पांचे अनावरण केले जाणार आहे. घाईगडबडीने अॅपचा डोलारा उभा केला जात असल्याची टीका स्मार्ट सिटीच्या कार्यक्रमावर केली जात असतानाच महापौरांचे निमंत्रण पत्रिकेतून नाव वगळणे, त्यांना स्वागताचे भाषण करण्याची संधी न देणे, प्रवेशिका न देणे या कृतीतून शहराच्या प्रथम नागरिकाचा अपमान केला जात असल्याची जोरदार टीका केली जात आहे. प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते. प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘प्रशासनाकडून साडेचारच्या सुमारास मला निमंत्रण पत्रिका मिळाली. त्यात महापौरांचेच नाव नसल्याचे निदर्शनास आले. इथे प्रशांत जगताप या व्यक्तीला महत्त्व नसून महापौरपदाचा प्रश्न आहे. यामुळे संपूर्ण शहराचा अपमान झाला आहे.’’भाजपाकडून कार्यक्रम हायजॅकअंकुश काकडे म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या ९ वर्षांत केलेल्या कामांमुळे स्मार्ट सिटी योजनेमध्ये पुण्याचा समावेश होऊ शकला आहे. निमंत्रण पत्रिकेमध्ये महापौरांचे नाव नसणे हा संपूर्ण शहराचा अपमान आहे. महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय लाभासाठी हा कार्यक्रम पुण्यात घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्ष म्हणून या कार्यक्रमात सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय आम्ही उद्या घेऊ’’राष्ट्रवादी गोंधळ घालेल म्हणून पास नाहीमहापौर प्रशांत जगताप यांना कार्यक्रमाचे पास दिल्यास हे पास घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पंतप्रधानांच्या कार्यक्रमात गोंधळ घालतील या भीतीने त्यांना पास देण्यास उशीर करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. महापौर हे संपूर्ण शहराचे असताना त्यांच्यावर इतका अविश्वास दाखविण्याच्या कृत्याचा सर्वथरातून निषेध केला जात आहे.पालकमंत्र्यांकडून समजूत घालण्याचा प्रयत्नमहापौरांनी पत्रकार परिषद घेऊन कार्यक्रमावर जाहीर नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मिळताच पालकमंत्री गिरीश बापट यांनी लगेच त्यांना फोन केला. फोनवरून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न बापट यांनी केला.भाजपा कार्यकर्त्यांकडून पासची खैरात -वृत्त/३
निमंत्रण पत्रिकेतून महापौर गायब
By admin | Updated: June 24, 2016 02:17 IST