Maharashtra Election Result 2019 : The two hundred fifty candidates luck will open from voting box at pune district | महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : उत्सुकता शिगेला! मतपेटीतून उघडणार पुणे जिल्ह्यातील अडीचशे उमेदवारांचे भवितव्य         
महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : उत्सुकता शिगेला! मतपेटीतून उघडणार पुणे जिल्ह्यातील अडीचशे उमेदवारांचे भवितव्य         

ठळक मुद्दे जिल्ह्यात कॅन्टोन्मेंटमधे सर्वाधिक  २८ उमेदवार असून, खालोखाल पिंपरीमधे १८ उमेदवार दोन मतदार संघातील निकाल काहीसा लागेल उशिराने

पुणे : आरोप प्रत्यारोप, नाराजी, रुसवा फुगवा, वचननामा, शब्दनामा आणि असंख्य आश्वासने देत विधानसभा निवडणूकीला सामोरे गेलेल्या जिल्ह्यातील २१ मतदारसंघातील २४६ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनमधून (इव्हीएम) उघडणार आहे. मतदारांनी कौल नक्की कोणाला दिला आणि कोठे खांदेपालट केला याची उत्सुकता देखील आज (दि. २४) संपणार आहे. दुपारपर्यंतच जिल्ह्यासह राज्यातील निकालाचा कल देखील स्पष्ट झालेला असेल. उमेदवारांची सर्वाधिक संख्या असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट आणि पिंपरीमधे मतदानाला वेळ तुलनेने अधिक लागेल. जिल्ह्यात कॅन्टोन्मेंटमधे सर्वाधिक  २८ उमेदवार असून, खालोखाल पिंपरीमधे १८ उमेदवार आहेत. याच दोन मतदारसंघात दोन बॅलेट युनिटची (बीयु) वापराव्या लागल्या. त्यामुळे या दोन मतदार संघातील निकाल काहीसा उशीराने लागेल. आंबेगावमधे सर्वात कमी सहा उमेदवार असून, खालोखाल भोर, मावळ आणि खडकवासला मतदारसंघात प्रत्येकी सात उमेदवार आहेत. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे नेते विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, संजय भेगडे, माधुरी मिसाळ, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे,राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, अतुल बेनके, कॉंग्रेसचे संजय जगताप आदी प्रमुख निवडणूक लढवत आहेत. भाजपाने तीन विद्यमान आमदारांना तिकिट नाकारले. त्यापैकी माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असून, गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांचे बंधू आणि स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांना कॅन्टोन्मेंटमधून उमेदवारी देण्यात आली. कोथरुडमधून मेधा कुलकर्णी यांच्या जागेवर भाजपा नेते चंद्रकांत पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर,शिवाजीनगर मतदारसंघात अंतर्गत विरोधामुळे विजय काळे यांच्या ऐवजी खासदार अनिल शिरोळे यांचे पूत्र सिद्धर्थ नशीब आजमावत आहेत.  
----------------  

या आहेत लक्षवेधी लढती  

भारतीय जनता पक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याखालोखाल राज्यातील प्रभावशाली नेता म्हणून भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाहिले जाते. लादलेला उमेदवार म्हणून विरोधकांनी त्यांची खिल्ली उडविली होती. कोल्हापूरातील पूरातून वाहून आलेले उमेदवार असेही त्यांना संबोधण्यात आले होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीने कोथरुड विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या किशोर शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे येथील बाजीगर कोण ठरतो याकडे लक्ष लागले आहे. 

- हडपसर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांनी अनेक वाद ओढवून घेतले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष चेतन तुपे आणि मनसेचे वसंत मोरे रिंगणात आहेत. तिनही तगडे उमेदवार आपापल्या भागामधे लोकप्रिय आहेत. या तिरंगी लढत लक्षवेधी ठरेल. 

- वडगावशेरी मतदारसंघात २०१४च्या निवडणूकीत मोदी लाटेतही सुनील टिंगरे यांचा निसटता पराभव झाला होता. यंदा टिंगरे राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढत देत आहे.  योगेश मुळीक यांना पुन्हा संधी मिळणार की गेल्यावेळच्या पराभवाचे टिंगरे उट्टे काढणार याबाबत उत्सुकता आहे. 

- पुरंदर मतदारसंघात मंत्री विजय शिवतारे यांच्या विरोधात गेल्यावेळी थोडक्या मतांनी पराभूत झालेल्या संजय जगताप यांनी तगडे आव्हान उभे केले आहे. 

- कॉंग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश करीत इंदापूरमधून राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांना आव्हान दिले आहे. याच मतदारसंघात जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले आहे.

Web Title: Maharashtra Election Result 2019 : The two hundred fifty candidates luck will open from voting box at pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.