महाराष्ट्र निवडणूक २०१९ : हडपसर विधानसभेत मतदानाचा टक्का घसरला; ५०.१६ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 07:00 AM2019-10-22T07:00:00+5:302019-10-22T07:00:11+5:30

Hadapsar Election 2019 : हडपसर विधानसभा मतदार संघात मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला व केवळ ५०.१६ टक्केच मतदान झाले.

Maharashtra Election 2019 : Voter percentage drcreased in Hadapsar Assembly; 50.16 percent of the voting | महाराष्ट्र निवडणूक २०१९ : हडपसर विधानसभेत मतदानाचा टक्का घसरला; ५०.१६ टक्के मतदान

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : हडपसर विधानसभेत मतदानाचा टक्का घसरला; ५०.१६ टक्के मतदान

googlenewsNext
ठळक मुद्दे मॉकपोल आणि नंतर मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही ठिकाणी मतदान यंत्र पडले बंद

पुणे : हडपसर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत असून ही प्रचारामध्ये फारशी रंगत न आल्याने, उमेदवारांना प्रचारांसाठी मिळालेला कमी कालावधी, मतदानावर असलेले पावसाचे सावट यामुळे प्रशासकीय यंत्रणेने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करुन देखील मतदानासाठी मतदार घराबाहेर पडला नाही. याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाला असून, हडपसर विधानसभा मतदार संघात मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला व केवळ ५०.१६ टक्केच मतदान झाले. मॉकपोल आणि नंतर मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडण्याच्या घटना वगळता मतदार संघात अत्यंत शांततेत मतदान पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली. 
     रविवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या धुवाधार पावसामुळे पत्राशेड मतदान केंद्रांमध्ये आलेल्या प्रचंड अडचणी, शाळांच्या मैदानांवर झालेला प्रचंड चिखल आणि सोमवारी (दि.२१) मतदानाच्या दिवशी देखील असलेले पावसाचे सावट यामुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे मोठे आवाहन निवडणूक प्रशासनासमोर होते. तर पाऊस पडल्यास मतदार घराबाहेर पडणार का या चिंतेत उमेदवार होते. परंतु मतदानाच्या दिवशी संपूर्ण दिवस पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतल्याने सकाळी ७ वाजल्यापासूनच मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. मतदार संघात सकाळाच्या वेळी अनेक मतदान केंद्रांवर आयटी क्षेत्रातील, सुशिक्षित मतदारांनी रांगा लावून मतदान केले. सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये असलेला उत्सहा दुपारनंतर काही प्रमाणात कमी झाला. सायंकाळी काही ठरावीक मतदान केंद्र वगळता बहुतेक सर्व ठिकाणी तुरळक गर्दी होती. पहाटे साडेपाच वाजता मॉकपोल सुरु झाल्यानंतर अनेक ठिकाणी मशिन बंद पडल्या असल्याचे लक्षात आले. त्यानंतर तातडीने दहा ते पंधरा मिनिटीता मशिन बदली करुन देण्यात आल्या. सकाळी ७ ते ९ यावेळेत ७.८३ टक्के मतदान झाले. त्यानंतर अनेक मतदान केंद्रांवर गर्दी होण्यास सुरुवात झाली. सकाळी ११ पर्यंत १२.७१ टक्के मतदान झाले. दुपारी १ पर्यंत मतदानाचा टक्का २९.१६ टक्के मतदान झाले. दुपार नंतर मात्र अनेक मतदान केंद्रांवक अत्यंत तुरळकपणे मतदार मतदान करताना दिसत होते. दुपारी १ ते ४ या कालावधीत मतदानाची टक्केवारी चांगलीच घसरली. त्यानंतर सायंकाळच्या वेळेत पुन्हा काही प्रमाणात गर्दीला सुरुवात झाली. सायंकाळी ५ पर्यंत हडपसर मतदार संघात ४८.८४ टक्के मतदान झाले. मतदानासाठी सायंकाळी ६ पर्यंतची वेळ असल्याने अखेरच्या एक तासामध्ये मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नाही. यामुळेच हडपसरमध्ये सरासरी ५०.१६ टक्के मतदान झाले. 
--------------------------
पावसामुळे मतदान यंत्रे बंद पडण्याचे प्रमाण वाढले
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पहाटे साडे पाच वाजता सर्व मतदान केंद्रांवर मॉकपोल सुरु करण्यात आले. परंतु रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे अनेक मतदान यंत्रांमध्ये मॉईश्र्चर  झाल्याने मॉकपोलच्या वेळीच अनेक ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे यंत्रातील व्हीव्हीपॅटला मोठ्या प्रमाणात मॉईश्र्चर जमा झाल्याने प्रथमच मोठ्या प्रमाणात मशिन बंद पडत आहेत. हे हाय रिक्स म्हणजे २ टक्क्यांपेक्षा अधिक होते. व्हीव्हीपॅट मध्ये असलेले सेन्सॉर अत्यंत संवेदनशील असते. यामुळे ढगाळ वातावरण आणि अति उष्ण वातावरणाचा देखील मशिन बंद पडू शकतात.
- निरजकुमार झा, भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी
----------------------
हडपसर विधानसभा मतदार संघातील २०१४ चे मतदान
- एकूण मतदार : ४ लाख १६ हजार ८४०
- झालेल्या मतदानाची टक्केवारी : ५२.३६ टक्के
- एकूण झालेले मतदान : २ लाख १८ हजार २४०
- पुरुष मतदार : १ लाख १९ हजार ८८५
- महिला मतदार : ९७ हजार ८१९
- इतर मतदार : ०१
----------------------------
हडपसर विधानसभा मतदार संघात लोकसभा २०१९ चे मतदान
एकूण मतदार :
एकूण झालेल्या मतदानाची टक्केवारी :
एकूण झालेले मतदान : 
पुरुष मतदार :
महिला मतदार : 
इतर मतदार : 
-----------------------
हडपसर विधानसभा मतदार संघात असे झाले मतदान
सकाळी ७ ते ९ : ७.८३ टक्के
सकाळी ०९ ते ११ : १२.७१ टक्के
सकाळी ११ ते ०१ : २९.१६ टक्के
दुपारी ०१ ते ०३ : ४१.१६ टक्के
सायंकाळी ०३ ते ०५ : ४८.८४ टक्के
अंतिम टक्के वारी : ५०.१६

Web Title: Maharashtra Election 2019 : Voter percentage drcreased in Hadapsar Assembly; 50.16 percent of the voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.