संजय माने - पिंपरी नागरीकरणावर नियंत्रण आणण्याच्या उपाययोजना यशस्वी झाल्या. झोपडपट्ट्यांची वाढ थांबली. त्यामुळे शहराच्या विविध भागांतील झोपडपट्ट्यांमधील आश्रयस्थाने संपुष्टात आली आहेत. चिखली, कुदळवाडी भागात मात्र परप्रांतीयांचे लोंढे धडकू लागले आहेत. गुन्हेगारी कारवायांमध्ये प्रामुख्याने कुदळवाडीतील आरोपींचे संबंध असल्याचे पोलीस तपासात वारंवार निष्पन्न होऊ लागल्याने आगामी काळात कुदळवाडी हे गुन्हेगारी कारवायांचे केंद्र बनेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. १९९७ मध्ये महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांपैकी चिखली, कुदळवाडी हा परिसर आहे. भंगार मालाची दुकाने, मोठी गोदामे, छोटी वर्क शॉप, मेटल प्रेस, जुने फर्निचर विक्रीची दुकाने, वाहनांचे सुटे भाग, मोठ्या कंपन्यांमधील भंगारात काढलेले संगणक व अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य, रीमोल्डिंग टायर अशा कितीतरी वस्तू उपलब्ध असलेली दुकाने, गोदामे, पत्राशेड या भागात दाटीवाटीने उभारली आहेत. अरुंद गल्लीबोळ, बारमाही चिखल, दलदल असलेले छोटे रस्ते, दुर्गंधी, दलदल, कोठे तरी कचरा, वायर जाळण्यासाठी लावलेली आग, त्यामुळे कायम धुमसत असलेली आग, धुराचे लोळ अशा परिस्थितीत छोट्या पत्र्याच्या खोल्यांमध्ये संसार थाटलेले, मिळेल ते काम करणारे कामगार असे चित्र कुदळवाडीत पहावयास मिळते. हाताला काम मिळवून देण्याची हमी असलेल्या कुदळवाडी भागात परप्रांतीयांचे लोंढे कायम येत आहेत. कुदळवाडी परिसर औद्योगिक गणला जात असला, तरी त्याआड काही अवैध धंदे राजरोसपणे चालवले जात आहेत. ४कुदळवाडी भागात भंगार गोदामे, छोटी वर्क शॉप या ठिकाणी काम करणारे कामगार प्रामुख्याने बिहार आणि उत्तरप्रदेशमधून आलेले आहेत. त्यांची रोजगार आणि राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते. कामगारांना राहण्याची व्यवस्था गोदामाला जोडून असलेल्या पत्राशेडमध्ये केली जात असल्याने त्यांना पोलिसांकडे भाडेकरू असल्याची नोंद करावी लागत नाही. या भागात नव्याने किती लोक येतात, किती परत जातात, याची आकडेवारी कोणाकडेही नाही. पिस्तूलविक्रीपासून अन्य गंभीर स्वरूपाच्या घटनांमधील आरोपींची पाळेमुळे या भागात आढळून आली आहेत. या भागात आश्रयाला येणाऱ्या गुन्हेगारांमुळे शहराची कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येणार आहे. त्यामुळे या भागातील नागरीकरणावरही नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
कुदळवाडीत परप्रांतीयांचे लोंढे
By admin | Updated: February 4, 2015 00:46 IST