पुणे : बावीस वर्षीय संगणक अभियंता असलेल्या खुशबू मिश्रा हिच्या खून प्रकरणाला तब्बल सहा वर्षे उलटली आहेत. मात्र, अजूनही तिचे कुटुंबीय तिला न्याय कधी मिळणार, या प्रतीक्षेत आहेत. एकीकडे महिलांविषयक खटले तातडीने चालवून न्यायनिवाडा करण्यासाठी विशेष न्यायालये स्थापण्यात आली. तसेच, उच्च न्यायालयानेही ५ वर्षांपूर्वीचे खटले तातडीने निकाली काढण्याचा आदेश दिलेला असतानाही २००८ मध्ये घडलेल्या या घटनेला आणि खुशबू मिश्रा हिला न्याय कधी मिळणार, असा प्रश्न तिचे कुटुंबीय उपस्थित करीत आहेत. खुशबू मिश्रा खून खटला, तसेच संगणक अभियंता नयना पुजारी खून व बलात्कार घटनेनंतर दिल्ली येथे घडलेले निर्भया प्रकरण जलदगतीने चालवून त्यात आरोपींना शिक्षाही सुनावण्यात आली आहे. मात्र अद्याप हे प्रकरण तारखांच्या आणि कामकाजाच्या कचाट्यात अडकून पडलेले आहे. विशेष म्हणजे निर्भया प्रकरणानंतर महिलांसाठीच्या विशेष न्यायालयांची स्थापना झाली. त्यात हे प्रकरणही वर्ग करण्यात आले; मात्र अद्याप या प्रलंबित खटल्याला पुरेसा प्रतिसाद लाभत नसल्याची खंत मिश्रा कुटुंबीयांचे स्रेही व्यक्त करीत आहेत. खुशबू मिश्रा ही तळवडे येथील एका कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करीत होती. यातील आरोपी मनू मोहिंदर अॅबरोल (वय २५) हा तिच्या कंपनीतच सहकारी होता. तो तिला वेळोवेळी एकतर्फी प्रेमातून त्रासही देत होता. याबाबत तिने कंपनीच्या व्यवस्थापकांना लेखी तक्रार देऊन कळविले होते. त्याला कंपनीने वॉर्निंग दिलेली होती. खुशबू व मनू यांचे प्रेमप्रकरण तुटले होते. या रागातून तसेच तिने त्याला विवाहास नकार दिल्यानेच मनूने २० आॅक्टोबर २००८ रोजी बालेवाडी येथील आदित्य ब्रिज पार्क सोसायटीतील तिच्या राहत्या घरी खून केला व त्यानंतर तो पळून गेला होता. पोलिसांनी नंतर त्याला भोपाळ येथून अटक केली होती. (प्रतिनिधी)
खुशबू मिश्रा खूनप्रकरणी ‘तारीख-पे-तारीख’
By admin | Updated: January 21, 2015 00:32 IST