कुरकुंभ : येथील औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पातील वाढते अपघात जणू रोजच्या जीवनमानातील एक सामान्य घटना असल्याचे चित्र निर्माण होत असताना, त्या सर्व घटनेशी संबंधित अधिकारी व प्रशासन यांचे हातावर घडी, तोंडावर बोट असाच काहीसा प्रकार सुरु आहे. मात्र, यामध्ये येथील सामान्य नागरिक व रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरवर्गाची मात्र मुस्कटदाबी होत आहे.रासायनिक प्रकल्पात वारवांर होणाऱ्या अपघाताच्या घटना खरतर खूप गांभीर्याने दखल घेण्याच्या आहेत. मात्र, दखल घेण्याचे अधिकार ज्यांच्या हातात आहे, तेच मूग गिळून गप्प बसण्याच्या प्रकाराने व कागदी घोडे नाचवून सर्व परवाने मिळवणाऱ्या उद्योजंकाच्या बोगस कारभाराने रोजंदारीने काम करणारा मजूरवर्ग किंवा पदवी प्राप्त केलेल्या बेरोजगार कामगारांना आपला जीव मुठीत धरुनच काम करण्यास भाग पडत आहे. या परिसरातील लोकप्रतिनिधींनी साधलेली चुप्पी त्यामुळे न्याय मागायचा तर कोणाकडे या चक्रव्यूहात येथील सामान्य नागरिक अडकलेला आहे. औद्योगिक क्षेत्रामधील गेल्या दोन महिन्यांपासून कुठल्यान कुठल्या कारणाने अपघात होत राहण्याच्या घटना घडत आहेत. या घटनांकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे भविष्यात मोठा अपघात झाल्यास जबाबदारी कुणाची? शनिवारी रात्री उशिरा झालेली अल्कली अमाईन्स या कंपनीतील घटना खरतर खूप काही सांगून जातेय. अगदीच काही अंतरावर असणाऱ्या लोकवस्तीवर याचा दुष्परिणाम होत आहे. तीव्र वास, पाण्याचे प्रदूषण व होणारा आवाज यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मध्यंतरीच्या एका व्यावसायिक रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी वारंवार होणाऱ्या अपघातावरील प्रश्नावर आमदार राहुल कुल यांनी प्रांताशी चर्चा करुन औद्योगिक क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकारी व सर्व कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या अधिकारी व जबाबदार व्यक्तीची बैठक बोलावून याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापपर्यंत त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात ईटरनीस या कंपनीत दोन कामगारांचा मृत्यू झाला व ही घटना पोलिसांपासून लपवण्याचा प्रयत्नही कंपनीच्या माध्यमातून करण्यात आला. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्या व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तरीही अपघातानंतरची परिस्थिती हाताळताना कंपनी प्रशासन प्रकरण दडपण्याचा प्रयास करत असल्याचा निर्वाळा अल्कली अमाईन्स या कंपनीने पोलिसांना गेटवरच थांबवून ठेवण्याच्या प्रकारावरुन दिसुन येत आहे. (वाार्ताहर)
औद्योगिक धोरणाने नागरिकांची कोंडी
By admin | Updated: November 16, 2016 02:55 IST