पुणे: धूम्रपान केल्याने आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतात. फुफ्फुस, अन्ननलिका, तोंड, घसा, पोट आणि गुदाशय आणि वंध्यत्वासारख्या समस्या उद्भवतात. विविध प्रकारच्या कर्करोगासह हृदयरोग, स्ट्रोक तसेच फुफ्फुसीय आजाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे, असे निरिक्षण डॉक्टरांकडून नोंदवले जात आहे.
धूम्रपान करणा-यांची दिवसागणिक वाढत असलेली संख्या चिंताजनक ठरत आहे. लोक ब-याचदा दुष्परिणामांकडे दुर्लक्ष करतात आणि भविष्यात पश्चाताप होतो. धूम्रपान केल्याने शरीराच्या जवळजवळ सर्वच अवयवांवर वाईट परिणाम होतो. धुम्रपान हे हृदयरोगाव्यतिरिक्त, स्ट्रोक, फुफ्फुसाचे रोग, मधुमेह, क्रॉनिक ब्रॉन्कायटीस आणि कर्करोगासही आमंत्रण देते.
डॉ. निशा पानसरे म्हणाल्या, ‘धूम्रपान केल्याने एखाद्याच्या पुनरुत्पादक प्रणालीला त्रास होतो. हे पुरुष आणि स्त्रिया दोन्हीमधील प्रजननक्षमतेस हानीकारक ठरते. ज्यामुळे गर्भधारणेचे प्रमाण कमी होते. जे नियमितपणे धूम्रपान करतात, त्यांच्यामध्ये गरोदरपणातील गुंतागुंत दिसून येते. सिगारेटच्या धुरामध्ये निकोटीन, सायनाइड आणि कार्बन मोनोआॅक्साइडसारख्या इतर रसायने देखील असतात. ब-याच स्त्रियांना रजोनिवृत्ती आणि गर्भाशय ग्रीवेचा कर्करोग होऊ शकतो. धूम्रपान केल्याने गर्भपात, एक्टोपिक गर्भधारणा, बाळांचे कमी वजन, जन्माजात दोष आणि क्रोमोसोमल विकृती, अकाली प्रसूती आणि अचानक मृत्यू होण्याचा धोका वाढतो. धूम्रपान केल्याने शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता कमी करून पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. एखाद्याला इरेक्टाइल डिसफंक्शनचा त्रास होऊ शकतो.’
धुम्रपानाच्या व्यसनामुळे फुफ्फुसाचा, अन्ननलिका, स्वरयंत्र, तोंड, डोके आणि मान, घसा, मूत्रपिंड, मूत्राशय, यकृत, स्वादुपिंड, पोट, गर्भाशय, गुदाशय कर्करोगाचा सामना करावा लागू शकतो. कारण तंबाखूच्या धुरामध्ये एसीटाल्हाइड, सुगंधित अमाईन, आर्सेनिक आणि रसायने असतात. कॅडमियममुळे अकाली मृत्यूही होऊ शकतो. निरोगी आयुष्यासाठी धूम्रपानाचे व्यसन सोडण्याशिवाय कोणताच उपाय नाही, अशी प्रतिक्रिया डॉ. शिवप्रकाश मेहता यांनी दिली.
----------------
काय करावे?
निरोगी जीवनशैली स्वीकारणे आणि धूम्रपानासारखे व्यसन सोडणे ही काळाची गरज आहे. आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे, निकोटीन रिप्लेसमेंट थेरपीचा समावेश असलेल्या धूम्रपान न करणा-या थेरपीची निवड करावी. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, केमोथेरपी आणि इतर उपचार घेत आहेत त्यांनाही धूम्रपान सोडण्याचा फायदा होईल. यामुळे कर्करोगाच्या पुनरावृत्तीचा धोका कमी होऊ शकतो.