पिंपरी : गतिरोधकामुळे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या अंजना सतिश सावंत (वय ४३, रा. चिंचवड) या महिलेचा रविवारी मृत्यू झाला. पांढरे पट्टे नसल्याने, गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वार महिलेला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे शहरातील अंतर्गत रस्त्यावर तयार केलेल्या चुकीच्या गतिरोधकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आणखी किती जणांचा बळी गेल्यानंतर महापालिका, पोलीस प्रशासन जागे होणार, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. १६ जूनला अंजना सावंत पतीसमवेत चिंचवड स्टेशनकडून शाहूनगरकडे दुचाकीवरून जात होत्या. त्या वेळी शाहूनगरच्या अलीकडे असणार्या गतिरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकी पडली होती. त्यात त्या जखमी झाल्या होत्या. त्यांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच अंजना यांचा रविवारी मृत्यू झाला. गतिरोधकावर पांढरे पट्टे मारणे आवश्यक असते. मात्र, या गतिरोधकावर पांढरे पट्टे नव्हते. सावंत यांना गतिरोधक दिसला नाही. त्यामुळे अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले गतिरोधक अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहेत. गतिरोधकाबाबतचे नियम काय आहेत, यावरही 'लोकमत'ने प्रकाश टाकला. आणखी किती जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी) चिंचवड, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर, गावठाण, तानाजीनगर, केशवनगर, बिजलीनगर या परिसरातील गतिरोधकांमुळे अपघातात वाढ, महापालिका, पोलीस प्रशासनाची उदासीनता याबाबत 'लोकमत' ने 'आता बास!'मधून चुकीच्या गतिरोधकांचा प्रश्न मांडला होता. छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध केले होते. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, तसेच अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी शहरातील रस्त्यांवर गतिरोधक तयार केले जातात. आणखी किती बळी?
गतिरोधकाने घेतला महिलेचा जीव आणखी किती बळी?
By admin | Updated: July 7, 2014 05:50 IST