अमोल मचाले, पुणेसरकार जनतेसाठी काही करीत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणावर टीका केली जाते. यात तथ्य असले तरी सरकार राबवत असलेल्या जनहिताच्या उपक्रमांना नागरिकांचा प्रतिसाद लाभत नाही, असाही विरोधाभास अनेकदा बघायला मिळतो. खडकवासला रस्त्यावर असलेल्या राष्ट्रीय जल आयोगामार्फत (एनडब्लूए) घेण्यात येणाऱ्या जलसाक्षरता कार्यशाळेबाबतही हेच चित्र बघायला मिळते. मोफत मार्गदर्शन मिळत असूनही याला ग्रामपंचायत, शाळांचा प्रतिसाद मिळत नाही.२००० मध्ये स्थापन झालेल्या या अकादमीत प्रशिक्षणाचे काम चालते. केंद्र आणि प्रसंगी राज्य सरकारच्या अखत्यारीतील विभागांच्या अधिकाऱ्यांना पाणी या विषयाशी संबंधित सर्वांगीण प्रशिक्षण येथे दिले जाते. केंद्रीय जल आयोगाचे हे देशातील एकमेव प्रशिक्षण केंद्र. वर्षभर येथे प्रशिक्षण चालते. याव्यतिरिक्त सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून एनडब्लूए ग्रामपंचायत, शाळा, एनजीओ यांच्यासाठी मोफत कार्यशाळा घेते. ‘‘यासाठी आम्ही परिसरातील ग्रामपंचायती, शाळा, एनजीओंना पत्र पाठवतो. शिवाय ँ३३स्र://ल्ल६ं.ेंँ.ल्ल्रू.्रल्ल/ या अकादमीच्या वेबसाईटवरही याबाबत माहिती दिलेली असते. मात्र, फार कमी प्रतिनिधी कार्यशाळेला येतात. हा विषय एक-दोन दिवसांत समजणे शक्य नसल्याने नंतर लोकांनी संपर्क साधल्यास मार्गदर्शन करण्यास आम्ही तयार आहोत. पण कार्यशाळेनंतर लोकांचा फिडबॅकही येत नाही आणि अधिक मार्गदर्शनासाठी ते संपर्कदेखील साधत नाहीत,’’ अशी खंत एनडब्लूएचे मुख्य अभियंता डॉ. एस. के. श्रीवास्तव यांनी मंगळवारी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.एनडब्लूएचे संचालक दत्तकुमार चासकर म्हणाले, ‘‘पुणे परिसरातील सुमारे १५० शाळांना आम्ही कार्यशाळेचे निमंत्रण पाठवतो. मात्र, यापैकी अर्ध्या शाळांचेदेखील शिक्षक प्रतिनिधी कार्यशाळेला येत नाहीत. ग्रामपंचायतींबाबतही हीच अवस्था आहे. वास्तविक पाहता, देशाच्या भावी नागरिकांना लहानपणापासून पाण्याचे महत्व कळावे, ते जलसाक्षर व्हावे, यादृष्टीने शाळांकडून मोठा प्रतिसाद अपेक्षित असतो. गावांकडे तर शहरी भागापेक्षा पाण्याची समस्या गंभीर असते. ती सोडवण्यासाठी उपयोगी असे मार्गदर्शन कार्यशाळेत केले जाते. आम्ही थेट गावात जाऊन त्यांचा प्रश्न सोडवून देऊ शकत नाही. मात्र, यासाठी मागणी केल्यास सविस्तर मार्गदर्शन नक्कीच करू शकतो. पण दुर्देवाने नेहमीच थंड प्रतिसाद लाभतो.’’कार्यशाळेस २०१२ मध्ये ४७, २०१३ मध्ये २७, तर २०१४ मध्ये केवळ ३४ शिक्षक उपस्थित होते. यापैकी कुणीही अधिक माहिती घेण्यामध्ये रस दाखवला नाही. २००८ मध्ये स्थानिक स्वराज संस्थासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. यासाठी राज्यातील अनेक ग्रामपंचायतींना निमंत्रित केले. मात्र, केवळ १७ प्रतिनिधी उपस्थित होते. २०११, २०१३ मध्येही असाच नकारात्मक प्रतिसाद होता. येत्या शुक्रवारी (दि. १३) ग्रामपंचायत, एनजीओ आणि माध्यम प्रतिनिधी यांच्यासाठी आयोजित कार्यशाळेलाही फारसा प्रतिसाद नाही.
जलसाक्षरता कार्यशाळेकडे ग्रामपंचायत, शाळांची पाठ
By admin | Updated: March 11, 2015 00:53 IST