पुुणे : ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाच्या सुपरस्पेशालिटी सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शहरातील वैद्यकीय महाविद्यालयांची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मदत घेतली असून, मोफत सर्वरोगनिदान शिबारांमार्फत २,५०२ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी रुग्णांना ७ कोटी ५० लाख ६० हजारांचा येणारा खर्च वाचला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन. डी. देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.बी.जे. वैद्यकीय, डी.वाय. पाटील, एमआयएमईआर महाविद्यालय, तळेगाव आणि भारती विद्यापीठ या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी पुणे जिल्ह्यातील १३ तालुके दत्तक घेतल आहेत. ‘‘ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्या गावामध्येच सुपरस्पेशालिटी सुविधा मिळाव्यात, यासाठी ही पावले उचलली गेली आहेत. दत्तक घेतलेल्या ठिकाणी महाविद्यालयातील विषयतज्ज्ञ प्राध्यापक आणि एम.डी.चे विद्यार्थी जातात. हे पथक तालुक्यांमध्ये जाऊन तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तपासणीबरोबरच आवश्यकता असल्यास शस्त्रक्रियासुद्धा करते. या योजनेंअतर्गत भारती हॉस्पिटलतर्फे वेल्हा तालुक्यातील ८ हजार लोकसंख्या असलेल्या पासली आरोग्य केंद्रात महिन्यातील पहिल्या मंगळवारी बालरोग, स्त्रीरोग, फिजिशियन, व नेत्ररोग या चार तज्ज्ञांच्या मार्फत सेवा दिली जाते. तसेच, या केंद्रांतर्गत कोणताही रुग्ण भारती हॉस्पिटलमध्ये आल्यास त्याच्यावर उपचार केले जातात. आतापर्यंत ५७४ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून, ८३ रुग्णांना मोफत शस्त्रक्रियेसह संदर्भसेवा देण्यात आली आहे. हीच सेवा भोर, वेल्हे, मुळशी, दौंड व पुरंदर या तालुक्यांत निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. सर्वंकष नेत्रतपासणीसाठीही भारती हॉस्पिटलशी सामंजस्य करार केला असून हवेली, भोर, वेल्हे, दौंड व पुरंदर या तालुक्यांतील २१ प्रथामिक आरोग्य केंद्रांत महिन्यातून एकदा नेत्रतज्ज्ञांची सेवा दिली जाते. आजअखेर ३६६ रुग्णांची तपासणी करून ४० रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)३२,८४० रुग्णांची मोफत तपासणीमोफत सर्वरोगनिदान शिबरांतर्गत आजअखेर २४ शिबिरे झाली. यात ३२,८४० रुग्णांची तपासणी करण्यात आली. तसेच, विविध प्रकारच्या २,५०२ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी बाजारमूल्यानुसार अंदाजे ७ लाख ५० लाख ६० हजार इतका खर्च झाला असता. तो वाचविण्यात या उपकक्रमाद्वारे जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.लोकसहभागातूनही आरोग्य केंद्र दर्जेदार करण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यातून खासगी संस्था, व्यक्ती यांच्याद्वारे प्रथामिक आरोग्य केंद्रासाठी सुसज्ज रुग्णवाहिका, अत्याधुनिक उपकरणे, औषधांची मदत जुन्नर, हवेली व मुळशी या तालुक्यांतील केंद्रांना प्राप्त झाली आहे.
दत्तक योजनेतून २,५०0 जणांवर मोफत शस्त्रक्रिया
By admin | Updated: May 17, 2015 01:01 IST