महेंद्र कांबळे, बारामतीसततच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीतच मुरवायचे, ओढ्या- नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह पुन्हा निर्माण करून खोलीकरण, रुंदीकरणाच्या माध्यमातून पाणी साठवायचे, असा कार्यक्रम बारामती तालुक्यात हाती घेण्यात आला होता. कृषी, पाटबंधारे, छोटे पाटबंधारे विभाग आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने लोक चळवळ उभारली. त्याला गावोगावच्या ग्रामस्थांनी सहकार्य केले. आता पडलेल्या पावसाचे पाणी वर्षभर साठण्याची क्षमता या ओढ्या- नाल्यांमध्ये बंधाऱ्यांच्या माध्यमातून झाले आहे. लोक चळवळ उभारली.... अन् पावसाचे पाणी अडवले, असेच चित्र आज बारामती तालुक्यात दिसत आहे. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असलेल्या तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून पावसाने सरासरीपेक्षा अत्यंत कमी हजेरी लावली. त्यातूनच पाणी प्रश्न निर्माण झाला. सुपे परगण्यातील सततचा दुष्काळ, २२ गावांतील कायम पाण्याचा प्रश्न पाहता तालुक्याचा अर्धा भाग अनेक वर्षांपासून बारमाही पाण्यापासून वंचित आहे. एकीकडे हिरवीगार बागायती शेती, तर दुसरीकडे उजाडलेली माळरान पाहण्याचे चित्र दिसते.या संदर्भात एन्व्हॉरर्मेंटल फोरमचे सुनिल मुसळे यांनी सांगितले, शासकीय कामाला लोकांचा सहभाग महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच माझ्या गावातील पाणी माझ्या शेतात, शिवारात अडले पाहिजे, अशी भूमिका घेऊन ग्रामस्थांना समजावले. त्यामुळे त्यांचा सहभाग वाढला. त्यांच्या सहभागाने बारामती तालुक्यातील जलसंधारणाची चळवळ लोकचळवळ झाली. छोटे पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता एल. एस. जगदाळे, तालुका कृषी अधिकारी डॉ. संतोष बरकडे आदींनी यासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
लोकचळवळ उभारली अन् पावसाचे पाणी अडले
By admin | Updated: September 1, 2014 05:14 IST