पिंपरी : मार्चअखेरीस प्राप्तिकर विवरणपत्र भरणे बंधनकारक असल्याचे माहीत असूनही जवळपास पाच ते दहा टक्के करदाते शेवटच्या दिवशी दाखल होतात. म्हणजेच सुमारे तीस ते साठ लाख करदाते अंतिम क्षणी जागे होतात.
मार्चअखेरीस विवरणपत्र भरण्याची तारीख असते. करदात्यांना वर्षानुवर्षे ही तारीख सवयीची आहे. बहुतांश व्यवसाय, उद्योग, भागीदारी संस्था, वैयक्तिक करदाते त्यासाठी आधीच सर्व प्रक्रिया पार पाडत असतात. असे असले तरी शेवटच्या दिवशी जागे होणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशात वैयक्तिक आणि भागीदारी संस्थांकडून सहा कोटी आणि एक कोटी व्यवसाय आणि उद्योगांकडून विवरणपत्र दाखल करण्यात येतात. शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहणाऱ्यांमध्ये वैयक्तिक करदात्यांची संख्या अधिक आहे. या करदात्यांचे विवरणपत्र भरण्यासाठी कर सल्लागार, चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) बुधवारी (दि. ३१) उशिरापर्यंत झटत होते.
सीए दिलीप सातभाई म्हणाले, शेवटच्या दिवशी जागे होणाऱ्यांची संख्या किमान पाच टक्के असेल. त्यामुळे शेवटच्या दिवशीही विवरणपत्र भरण्यासाठी धावपळ सुरूच असते. एकाच वेळी अनेकांनी संकेतस्थळ वापरल्यास ताण येतो. काही काळ पॅनकार्ड लिंक करताना अडचण आली.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) कर विभागाचे प्रमुख चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले, की परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत जशी तयारी केली जाते, तसे शेवटच्या दिवशी विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशात सहा कोटी वैयक्तिक आणि भागीदारी फर्मचे करदाते आहेत. तर, उद्योग आणि व्यवसायाचे एक कोटी विवरणपत्र दाखल होतात. उद्योगांकडून शेवटच्या दिवसाची वाट पाहिली जात नाही. वैयक्तिक करदात्यांपैकी पाच ते दहा टक्के शेवटच्या दिवशी येतात.
----
शेवटची तारीख चुकल्यास पाच हजार दंड
विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख चुकल्यास संबंधित करदात्यास कमीतकमी पाच हजार रुपये शुल्क मोजावे लागू शकते. याशिवाय दरमहा एक टक्का याप्रमाणे करपात्र रकमेवर व्याजही भरावे लागते, असे सीए दिलीप सातभाई आणि चंद्रशेखर चितळे यांनी सांगितले.
-----
मुद्रांक कार्यालयात मुद्रांकनाची धावपळ
मुद्रांक सवलतीचा शेवटचा दिवस असल्याने मुद्रांकनासाठी शहर आणि पिंपरी चिंचवड मधील दुय्यम निबंधक कार्यालयात धावपळ सुरु होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये २८ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. या कार्यालयात दस्त नोंदणी आणि मुद्रांकनासाठी गर्दी झाली होती. मुद्रांकन केल्यानंतर चार महिन्यात दस्त नोंदणी केली तरी चालते. सदनिकेवरील मुद्रांक शुल्कात मार्च अखेरीस दोन टक्के सवलत होती. या सवलतीचा फायदा घेण्यासाठी अनेकांनी मुद्रांकन केल्याचे समजते.
--------------