लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर: कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सुपर स्प्रेडर शोधून काढले जाणार आहे. मंचर शहरातील सर्व व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट केली जाणार असून मंचर शहरात बुधवारी व गुरुवारी कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार रमा जोशी यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यात कोरोना वेगाने वाढू लागला आहे. दिवसेंदिवस रुग्णाची संख्या वाढत असून मंचर शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.
यासंदर्भात ग्रामपंचायत सभागृहात दुकानदार, भाजीपाला विक्रेते तसेच व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तहसीलदार जोशी बोलत होत्या. यावेळी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, सरपंच किरण राजगुरू, उपसरपंच युवराज बाणखेले, ग्रामविकास अधिकारी के.डी. भोजने, माजी सरपंच बाळासाहेब बाणखेले, दत्ता गांजाळे, दत्ता थोरात, सुनील बाणखेले, सागर काजळे आदी उपस्थित होते.
तहसीलदार रमा जोशी म्हणाल्या १ ते १३ मार्च यादरम्यान तालुक्यात रुग्ण संख्या २०३ वर गेली आहे. कोरोनाला आत्ताच रोखले नाही. तर मागील वर्षीच्या सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यासारखी परिस्थिती होऊन लाट येण्याची शक्यता आहे. हे टाळायचे असेल तर कोरोणाचे सुपर स्प्रेडर शोधून काढावे लागतील.
गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी ग्रामपंचायतीने जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन केले. उपसरपंच युवराज बाणखेले यांनी शहरातील प्रभागानुसार ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी नेण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत माजी सरपंच दत्ता गांजाळे, वसंतराव बाणखेले, संदीप बाणखेले, राजेंद्र थोरात, जगदीश घिसे, अमर कराळे, सुहास बाणखेले, आशिष पुगलिया, प्रवीण मोरडे, नवनाथ थोरात, बाळासाहेब बाणखेले आदींनी सहभाग घेतला.
चौकट
मंचर शहरातील, भाजीपाला विक्रेते, दुकानातील कर्मचारी यांची कोरोना तपासणी केली जाईल. मंचर शहरात बुधवारी व गुरुवारी कॅम्पचे आयोजन केले जाणार आहे. आठवडे बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता विक्रेत्यांची तपासणी होणे गरजेचे आहे. कोरोना नियमाचे प्रत्येकाने पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
कोट
तालुक्यात १८० रुग्ण ऍक्टिव्ह आसून सात गावांमध्ये पाच पेक्षा जास्त रुग्ण आहेत. व्यापाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे नसतील तरी त्यांनी स्वतःची तपासणी करून घ्यावी. व्यवसायिकांनी स्वतः बरोबर कामगारांची कोरोना तपासणी करून घ्यावी.
- डॉ. सुरेश ढेकळे, तालुका आरोग्य अधिकारी