लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : अन्न आणि अैाषध प्रशासनाने (एफडीए) गुटखा आणि पानमसाला विक्रेत्यांविरोधात मोहीम उघडली आहे. त्याअंतर्गत पुणे आणि सोलापूरमध्ये केलेल्या कारवाईत तब्बल ६१ लाख १६ हजार ८९० रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. प्रतिबंधित मालाची साठवणूक, वाहतूक करणारे आणि वाहनाचा मालक या सर्वांवर कारवाई केली.
गुटखा, पानमसाला अशा पदार्थांचे उत्पादन, वाहतूक, साठवणूक, वितरण आणि विक्री यावर राज्यात बंदी आहे. त्यानंतरही राज्यात सर्वत्र गुटखा आणि पानमसाला उपलब्ध होत आहे. त्यापार्श्वभूमीवर एफडीएने गेल्या आठवड्यापासून गुटखा आणि पानमसाल्याची विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम उघडली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी पुणे आणि सोलापूरमध्ये कारवाई करीत मोठ्याप्रमाणावर गुटख्याचा साठा जप्त केला.
कुपाराम काळूराम चौधरी याच्या म्हाळुंगे रस्त्यावरील महालक्ष्मी ट्रेडिंग गोडाऊनवर कारवाई केली. येथून ९ लाख ७४ हजार रुपयांचा पानमसाला आणि प्रतिबंधित तंबाखूचा साठा केला. सुरेश मिलापचंद जैन याच्याकडून २ लाख ३८ हजार रुपयांचा पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. दक्षिण सोलापूर येथे वाहनावर केलेल्या कारवाईत ३८ लाख ५० हजार रुपयांचा पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त केला. वाहनचालक मैनुद्दीन खान, सहचालक समिउल्ला खान आणि वाहनचालक योगेश भोर याच्याविरोधात दक्षिण सोलापूरमधील मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
एफडीएचे अधिकारी अ. य. इलागोर, ग. पा. कोकणे, स्वा. द. म्हस्के, नि. ब. खोसे यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती एफडीएचे सहआयुक्त शिवाजी देसाई यांनी दिली.
---
कर्नाटक, गुजरातमधून येतो गुटखा
कर्नाटक आणि गुजरात राज्यातून महाराष्ट्रात गुटखा व पानमसाला येत आहे. पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर भागावर एफडीएने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सीमावर्ती भागातील टोलनाक्यावर पाळत ठेऊन कारवाईचे आदेश दिले आहेत. या आर्थिक वर्षात विभागामध्ये १९३ ठिकाणी कारवाई केली असून, ३ कोटी २४ लाख ४४ हजार रुपयांचा साठा जप्त केला आहे. तर, गुटखा-पानमसाल्याची विक्री केल्याप्रकरणी ३१ आस्थापना सीलबंद केल्या आहे. ९० वाहने जप्त केली आहेत.