सोमेश्वरनगर : सध्या साखरेचे दर कोसळले आहेत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कमी दर मिळाला आहे. आगामी हंगामात टनाला १५०० रूपयेच दर मिळण्याची परीस्थती निर्माण झाली आहे. मात्र तरीही शेतकऱ्याची ऊस पिकाकडून इतर पिकाकडे वळण्याची मानसिकता बदलत नाही. सध्या ऊसलागवड हंगाम सुरू आहे. जिल्हयातील कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील अडसाली ऊस लागवड एक लाख एकरांहूनही जादा होण्याची चिन्हे दिसत आहेत. साखरेचे घसरलेले दर, देशाच्या गरजेपेक्षा दरवर्षी तयार होणारी जादा साखर यामुळे राज्यातील साखर कारखानदारी ‘शॉर्ट मार्जीण’मध्ये गेली आहे. साखर कारखान्यांबरोबरच आता ऊसउत्पादक शेतकरी ही शॉर्ट मार्जीणमध्ये गेल्याने ऊस पिक शेतकऱ्यांसाठी बेभरवशाचे झाले असले आहे. मात्र मजुरांच्या तुटवडयामुळे शेतकरी ऊस पिक सोडून इतर पिकांकडे वळण्याचे नाव घेत नाही. यावर्षी साखर कारखान्यांनी सन २०१५— १६ चा ऊस लागवड हंगाम बुधवार पासून (दि. १ जुलै)जाहीर केला आहे. जिल्हयात सुमारे एक लाख एकरांपेक्षाही जादा ऊस लागवड होण्याची चिन्हे आहेत.एकीकडे ऊसाला दर नाही. तर दुसरीकडे शेतीला होण्याऱ्या खर्चात काही फरक पडला नाही. नांगरट, सरी, ऊसलागवड, व रासायनिक खते आदी चे दर कमी होण्यापेक्षा दिवसेदिवस वाढतच आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एकीकडे शेतीचा उत्पादन खर्च वाढला आहे.तर दूसरीकडे ही ऊसाची एकरी सरासरी पडली आहे. राज्यातील अनेक कारखान्यांची एकरी सरासरी ४० ते ४२ टनाच्या आसपास आहे. त्यामुळे ऊसाला कमी मिळणारा दर लक्षात घेता आता कमी खर्चात ऊसशेती करण्याची गरज आहे. यासाठी योग्य बेणे निवड करणे गरजेचे आहे. हे करत असताना ऊसाचे एकरी टनांची सरासरी कशी वाढेल हे पाहणे आवश्यक आहे. तसेच राज्यातील ऊसउत्पादकांना अजून त्यांची ऊसाची एफआरपी मिळाली नाही. त्यामुळे सद्या शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. (वार्ताहर)
शेतकऱ्यांची पसंती ऊस पिकाला
By admin | Updated: July 8, 2015 01:33 IST