कापूरव्होळ : कासुर्डी (गु.मा) (ता.भोर) येथे गुरुवारी 3 वाजण्याच्या सुमारास गणोश विसर्जन करण्यासाठी गुंजवणी नदीत उतरलेल्या एकाचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उद्धव मालुसरे (वय-52 वर्षे) असे या बुडालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचा मृतदेह न मिळाल्याने एनडीआरएफच्या जवानांना शोधकार्यासाठी बोलावण्यात आलेले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कासुर्डी येथे सातदिवसीय गणरायाचे विसर्जन करण्याकरिता उद्धव मालुसरे हे गुंजवणी नदीवर आले होते. विसर्जनासाठी ते नदीत उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. याच वेळी पाण्याचा लोंढा आल्याने ते नदीत बुडाले. त्यांच्या शोधासाठी स्थानिक कातकरी समाज व पोहणारे व्यक्ती यांच्यामार्फत 2 ते 3 तास प्रयत्न करूनही ते सापडले नाहीत.
घटनास्थळी राजगडचे पी.आय. साळवी यांनी भेट दिली. भविष्यात गुंजवणी नदीच्या तीरावर अशा घटना घडू नये यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, असे कासुर्डी गु मा.चे सामाजिक कार्यकर्ते मानसिंग भाऊ मालुसरे व नरवीर तानाजी प्रतिष्ठानने मत व्यक्त केले. घटनास्थळी मंडलाधिकारी ताई हजारे, तलाठी मुलाणी, चंद्रकांत थोपटे यांनी भेट दिली. वासंती देवकर, संतोष दगडे, जगन्नाथ मालुसरे, परशुराम मालुसरे आदींनी त्यांना शोधण्याचा प्रय} केला. (वार्ताहर)
4 तहसीलदार यांची भेट : घटनास्थळी तातडीने भोरचे तहसीलदार राम चोबे यांनी भेट देऊन प्रत्यक्ष घटनास्थळांची पाहणी केली. उद्धव मालुसरे यांचा पाण्यात शोध घेण्यासाठी एनडीआरएफ विभागाशी तत्काळ संपर्क साधून मदत मागितली आहे.