लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “ज्येष्ठ शास्रज्ञ व नाशिक येथील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांचे ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व सर्वमान्य आहे. आज आम्ही त्यांना साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले. तसेच संमेलनाची रूपरेषाही समजावून सांगितली. नारळीकर हे येत्या २५ मार्चला नाशिकला पोहोचतील. त्यांच्या सोयीनुसार संमेलनात सहभागी होतील. त्यांना त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत,” असे नियोजित संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या २६ ते २८ मार्चदरम्यान नाशकात होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष या नात्याने डॉ. नारळीकर यांना आमंत्रित करण्यासाठी भुजबळ गुरुवारी (दि.४) पुण्यात आले होते. आयुका येथे डॉ. नारळीकर यांची भेट घेऊन भुजबळ यांनी त्यांना संमेलनाचे निमंत्रण दिले. ज्येष्ठ गणितज्ज्ञ डॉ. मंगला नारळीकर, संमेलनाची निमंत्रक संस्था असलेल्या लोकहितवादी संस्थेचे कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर या वेळी उपस्थित होते. यावेेळी भुजबळ बोलत होते. “संमेलनाध्यक्षांच्या स्वागतासाठी नाशिककर उत्सुक आहेत”, असेही ते म्हणाले.
“संमेलनात मी राजकीय व्यक्ती म्हणून नव्हे, तर नाशिककर म्हणून स्वागताध्यक्ष या नात्याने साहित्य रसिकांचे स्वागत करणार आहे,” असे भुजबळ यांनी सांगितले. “साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर राजकीय व्यक्ती असू नयेत, या कौतिकराव ठाले पाटील यांच्या मताशी मी सहमत आहे. साहित्य संमेलनात कोणाला बोलवायचे याचा निर्णय साहित्य महामंडळ घेईल. त्यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करणार नाही. संमेलनाच्या व्यासपीठावर सहस्रचंद्रदर्शनानिमित्त शरद पवार यांचा सत्कार करण्याचा कोणताही प्रस्ताव नव्हता,” असेही त्यांनी सांगितले.
चौकट
‘आर्मस्ट्राँग’ म्हणजे भुजबळ!
“खगोलशास्त्राच्या अभ्यासाच्या निमित्ताने डॉ. नारळीकर यांचा अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग यांच्याशी संबंध आलेला आहे. आज भुजबळ भेटले, याकडे लक्ष वेधले असता ‘आर्मस्ट्राँग’ला मराठीत ‘भुजबळ’ म्हणतात,” अशी कोटी छगन भुजबळ यांनी केली.