अंकुश जगताप , पिंपरी एके काळी जमीनदार म्हणून गावात नावाजलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या सात-बारावर (७ /१२) आता जमीनच उरली नाही. विविध कारणांमुळे शेतजमीन घटत गेल्याने आजमितीला अशा वतनदारांच्या नावापुढे भूमिहीन असा शिक्का पडला आहे. या कुटुंबातील मुलांची धनिक कुटुंबीयांच्या मुलींसोबत सोयरीक जुळून येणे दुरापास्त झाले आहे. परिणामी, अशा शेतकऱ्यांसाठी १ जूनपासून सुरू असलेला कृषी जागृती सप्ताह वांझोटाच असल्याची भावना व्यक्त होत आहे. दहा वर्षांपूर्वीपर्यंत पिंपरी-चिंचवड शहर आणि लगतच्या मावळ, मुळशी तालुक्यांमध्ये बहुतेक शेतकऱ्यांकडे शेतीक्षेत्र मोठ्या प्रमाणात होते. एकेका कुटुंबाच्या नावे किमान पाच पंचवीस एकर जमीन असायचीच. एकत्र कुटुंबपद्धती आणि शेतीवर अवलंबित्व असल्याने अशा अनेक घराण्यांचा गावात मोठा दबदबा असायचा. मोठे बागायतदार, जमीनदार म्हणून अशा घरांची पंचक्रोशीत ओळख असायची. अशा घरात आपली मुलगी नांदण्यास जावी, अशी अनेक पित्यांची इच्छा असायची. तालेवार घराणे म्हणून वधूपिता सोयरिक जुळविण्यास तयार व्हायचे. मागील काही वर्षांमध्ये गावामधील अशा तालेवार घराण्यांच्या रुबाबाला अनेक कारणांमुळे घरघर लागली आहे. सुरुवातीला शहरामधील व लगतच्या भागातील एकेका गावातील अनेक घरांच्या सर्वच्या सर्व जमिनी विविध शासकीय कारणांसाठी संपादित झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ आली आहे. कुटुंबे विभक्त झाल्याने कुटुंबकर्त्याच्या हातचा कारभार अनेकांहाती गेला आहे. अशातच नागरिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढल्याने जमिनीला मागणी वाढली. काही नवख्या कारभाऱ्यांनी शेतीविक्रीचा सपाटा लावत एकेक करून अनेक शेतांचे सातबारे निकाली काढले. यापैकी अनेक शेतकऱ्यांनी पुन्हा शेतजमीन खरेदीबाबत अनास्था दाखविल्याचे प्रकार घरोघरी झाले आहेत. मिळालेल्या पैशांच्या नियोजनाअभावी त्यांच्याकडे शेती नावापुरतीच उरली आहे. एके काळी गावात तालेवार असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांकडे आता घरापुरतीच जागा उरल्याची स्थिती शहरात, तसेच लगतच्या गावांमध्ये पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला आधीच कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना इतर पर्यायच नसल्याने गरजा भागविण्यासाठी, मुलांच्या लग्नांसाठी आहे ती मिळकत विकण्याची वेळ आली. - एकीकडे आधीच मुलींचे प्रमाण घटले असताना नवरी मिळणे कठीण झाले आहे. मुलांसाठी वधूचा शोध घेण्यात अनेक घरांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. वधूपित्याकडून आता भावी काळातील तजवीज म्हणून भावनिक मुद्दयांपेक्षा आर्थिक, व्यावहारिक बाबींची पडताळणी करून घेतली जात आहे. त्यातच केवळ शेती नाही म्हणून अशा घरांमध्ये आपली मुलगी देण्यासाठी अनेक वधूपिता नकार देऊ लागले आहेत. परिणामी, मुलांची लग्ने जुळविण्यात पालकांची चांगलीच दमछाक होत आहे.
वतनदार शेतकऱ्यांचा ७/१२ रिकामा
By admin | Updated: July 1, 2015 23:48 IST