पिंपरी : शहर विद्रुप दिसेल, अशा पद्धतीने विधानसभा इच्छुकांनी भिंती रंगवल्या आहेत. महापालिका अधिका:यांनी उद्याच या भिंती स्वच्छ कराव्यात, असे आदेश विविध प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शहराच्या दौ:यावर आलेल्या उपमुख्मंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आयुक्त राजीव जाधव यांना दिले होते, परंतु शहरात कोठेही भिंती स्वच्छ करण्याची कारवाई दिसून आली नाही. महिन्याचा दुसरा शनिवार हा कार्यालयीन कामकाज बंदचा दिवस असल्याने महापालिका प्रशासनाने सोईस्कर नियोजन केल्याचा प्रत्यय आला.
महापालिका मिळकतींच्या ठिकाणच्या मोकळ्या जागा, रस्त्यालगतच्या सीमाभिंती, सार्वजनिक स्वच्छतागृह अशा ठिकाणी विधानसभा इच्छुकांनी रंगरंगोटी केली आहे. प्रचाराच्या उद्देशाने भिंती रंगवल्या आहेत.
कशाही पद्धतीने भिंती रंगवल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. ज्यांना प्रचार करायचा आहे, त्यांनी रितसर महापालिकेची परवानगी घेऊन जाहिरात फलक लावावेत. त्यास कोणाची हरकत नाही. महापालिकेने वेळीच दखल घेऊन अशा प्रकारे भिंती रंगवणा:यांना रोखले पाहिजे. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी महापालिका अधिका:यांना सुनावले होते.
उपमुख्यमंत्र्यांनी कडक शब्दात ताकीद दिल्यानंतर शनिवारी सकाळपासूनच भिंती स्वच्छ करण्याची कारवाई सुरू होईल. स्वच्छतेबाबत आयुक्त जाधव आग्रही असल्याने या कारवाईला विलंब होणार नाही, असा नागरिकांचा समज होता. तो फोल ठरला. (प्रतिनिधी)