पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, ४ जुलै रोजी तक्रारदार महिला तिच्या घरासमोरील नळावर पाणी भरत असताना पोलीस पाटील सवाणे याने महिलेला मोटार वेळेत का बंद करीत नाही, असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली. पाणी सुरू असणारी मोटार उचलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिलेचा हात पकडून गैरवर्तन केले. यावेळी पोलीस पाटील सवाने याचे सोबत त्याचा भाऊ मधु आणि मुलगा भैया यांनीही पीडितेला आणि तिच्या मुलाला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
प्रकरणाचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने करीत आहेत.
ग्रामीण भागात पोलीस पाटलांना विशेष अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे गावातील वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची ठरत असते. मात्र पोलीस पाटलांनी आपल्या पदाचा गैरवापर केला तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल होवू शकतो हे यातून अधोरेखित झाले आहे. पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.