पुणे : बेकायदेशीरपणे खासगी सावकारी केल्याच्या आरोपावरुन चतु:श्रृंगी पोलिसांनी एका दाम्पत्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी शहर उपनिबंधक दिग्विजय हेमनाथ राठोड (वय ५०, रा. पाषाण सूस रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन विजय वंजी पाचपुते आणि त्यांची पत्नी निता विजय पाचपुते (रा. मॉडेल कॉलनी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाम्पत्यांकडे ४ जणांचे कोरे धनादेश, १७ बँक पासबुक आणि १५ खरेदीखत मिळून आले आहेत. हा सर्व प्रकार २००८ ते २०२१ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुणे शहर उपनिबंधक आहेत. आरोपींनी विना परवाना सावकारी करून नागरिकांकडून कोरे धनादेश व खरेदीखत ताब्यात ठेऊन नागरिकांना भरमसाठ दराने कर्ज दिले. याबाबत एका महिलेने त्यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. त्याअनुषंगाने त्यांनी चौकशी केली. त्यामध्ये आरोपींकडे सावकरी करण्यासाठी कोणताही परवाना आढळून आला नाही. तसेच, त्यांच्याकडे शिला मधुमल, मनिषा देशमुख, राजेश साउंड अँड मंडप डेकोरेटर्स, प्रकाश कामठे यांच्या नावाचे लिखीत धनादेश, कोरे धनादेश, १७ पासबुक, १५ खरेदीखत विनापरवाना असल्याचे आढळून आले.
आरोपी हे ही कागदपत्रे ठेवून खासगी सावकारीचा व्यवसाय करत असल्याचे चौकशीत समोर आले. त्यानुसार दोघांच्या विरोधात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमनानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक एल. एस. उकीर्डे अधिक तपास करत आहेत.