- दीपक जाधव, पुणेमहापालिका प्रशासनाकडून सलग ११वी सहभागी अंदाजपत्रकाची प्रक्रिया पूर्ण करण्यात असून नागरिकांनी सुचवलेली ९०० विकासकामे आगामी अंदाजपत्रकात मार्गी लागणार आहे. नागरिकांकडून आलेल्या दहा हजार सूचनांची छाननी करून या कामांना मान्यता देण्यात आली आहे. सहभागी अंदाजपत्रकाची संकल्पना सातत्यपूर्ण राबवून पुणे महापालिकेने एक चांगली परंपरा निर्माण केलेली आहे.महापालिकेच्या वतीने २००६-०७ पासून सहभागी अंदाजपत्रकाची संकल्पना राबविण्यास सुरूवात करण्यात आली. या संकल्पनेअंतर्गत नागरिकांकडून प्रशासनाला विकासकामे सुचविली जातात, त्यानुसार प्रशासनाकडून कार्यवाही केली जाते. त्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये दरवर्षी ३७ कोटी ५० लाख रुपयांची स्वतंत्र तरतूद केली जाते. हा निधी केवळ नागरिकांनी सुचविलेल्या विकासकामांवर खर्च केला जातो. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये महापालिका निवडणुका असल्याने यंदा महापालिकेचे अंदाजपत्रक आयुक्तांकडून मार्च अखेरीस सादर होणार आहे. त्यासाठी सहभागी अंदाजपत्रकाची प्रक्रिया प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. महापालिकेकडून सलग ११ वर्षे सातत्याने ही संकल्पना राबविण्यात येत असल्याने त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा दहा हजार नागरिकांनी प्रशासनाकडे विविध स्वरूपाची विकासकामे सुचविली. त्यापैकी ९०० विकासकामांचा समावेश अंदाजपत्रकामध्ये करण्यात आला आहे. एका व्यक्तीला ५ लाख रुपयांपर्यंतचे काम सुचविता येते. आपल्या प्रभागातील नेमके प्रश्न काय आहेत. त्यासाठी कोणत्या सेवा, सुविधा आवश्यक आहेत, याची चांगली जाण स्थानिक नागरिकांना असते. त्यामुळे त्यांनी महापालिकेला त्याबाबतची कामे सुचवावीत, असे आवाहन प्रशासनाकडून आॅगस्ट महिन्यामध्ये नागरिकांना केले जाते. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत हा उपक्रम राबविला जातो. नागरिकांच्या लेखी सूचना प्राप्त झाल्यानंतर प्रभाग समितीच्या अध्यक्षकडून बैठक घेतली जाते. नागरिकांच्या सूचनांनुसार कामांचा प्रारूप आराखडा तयार केला जातो. त्या कामांना मान्यता दिली जाते. प्रभाग समितीने मान्यता दिलेल्या कामांचा आयुक्तांकडून मुख्य अंदाजपत्रकामध्ये समावेश केला जातो. प्रामुख्याने पदपथ, पाणीपुरवठा, गटारे आदी कामांना प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर पदपथांची दुरूस्ती करणे, रस्त्यांवर दिवे बसविणे, गटारांची व्यवस्था करणे आदी छोट्या स्वरूपाची कामे यामुळे मार्गी लागतात. त्यामुळे नागरिकांनाही चांगला दिलासा मिळतो आहे.महापालिकेच्या वतीने सातत्याने राबविण्यात येत असलेल्या या नागरिकांच्या सहभागी अंदाजपत्रकासाठी महापालिकेला नुकतेच ‘ई. रामचंद्रन पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे. बंगळुरूच्या जनाग्रह सेंटर फॉर सिटीजनशिप या संस्थेच्या वतीने पुणे महापालिकेच्या या सातत्यपूर्ण उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे. प्रभागासाठी ५० लाखसहभागी अंदाजपत्रकामध्ये प्रत्येक प्रभागासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. एकूण ३७ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद यासाठी अंदाजपत्रकामध्ये केली जाते. एका कामासाठी वैयक्तिक स्तरावर ५ लाख रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे.सहभागी अंदाजपत्रकामध्ये सहभागी अंदाजपत्रकासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुचविलेल्या विकासकामांची ९० टक्क्यांपर्यंत अंमलबजावणी होते. यामुळे सहभागी अंदाजपत्रकाच्या संकल्पनेस चांगला प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे.- उल्का कळसकर, मुख्य लेखापाल
नागरिकांची ९०० कामे लागणार मार्गी
By admin | Updated: March 10, 2017 05:11 IST