बारामती : सिद्धेश्वर निंबोडी (ता. बारामती) परिसरात शुक्रवारी (दि. २९) चिंकारा हरणाची शिकार केल्याचा प्रकार घडला. याबाबत अज्ञात ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर वन अधिका-यांनी रात्री या ठिकाणी छापा टाकला. वन अधिकाऱ्यांना हरणाचे मांस छाप्याच्या वेळी आढळून आले. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. हरणाची शिकार एका पारधी समाजातील व्यक्तीमार्फत करून इतर ७ ते ८ जण वाटा करून मटनावर ताव मारत असल्याची चर्चा आहे. शुक्रवारीदेखील भरदिवसा चिंकारा हरणाची शिकार करण्यात आल्याची चर्चा होती. वन विभागाला अज्ञात व्यक्तींकडून याबाबत माहिती समजली. त्याची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत तत्काळ सिद्धेश्वर निंबोडी परिसरातील लांडगेवस्तीवर पोहोचले. मात्र, त्या घरातील पारधी समाजातील इसम बायका-मुलांसह पळून गेल्याचे या वेळी निष्पन्न झाले. मात्र, वन अधिकाऱ्यांना या ठिकाणी मांस सापडले आहे. हे मांस वन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, कर्मचाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष त्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. मात्र, संबंधित इसम हा त्याच्या कुटुंबासह फरारी झाला आहे. या ठिकाणी मांस सापडले आहे. हे मटन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी मंगळवारी (दि. ३०) पाठविण्यात येईल. या मांसाची तपासणी केल्यानंतर याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात येईल. हे मांस हरणाचे असल्याची शक्यता अधिक आहे. साधे मांस असल्यानंतर संबंधित इसम फरार झाला नसता, असेदेखील त्यांनी नमूद केले. येत्या काही दिवसांत लॅबमधून लवकरात लवकर तो अहवाल मिळण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. त्यानंतर शिकार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल. पारधी समाजातील त्या इसमाला ताब्यात घेण्यासाठी वन विभागाने तत्काळ पावले उचलली आहेत. शुक्रवारी रात्रीपासूनच वन कर्मचाऱ्यांमार्फत त्याच्या घरावर ‘नजर’ ठेवण्यात आली आहे. त्याची माहिती गोळा करण्यासाठी लवकरच पथके पाठविण्यात येतील. (प्रतिनिधी)
सिद्धेश्वर निंबोडी परिसरात चिंकारा हरणाची शिकार?
By admin | Updated: August 29, 2014 23:58 IST