लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “शेतकरी हे आपले शत्रू नव्हेत. ते परदेशातील लोक नसून याच देशाचे नागरिक आणि आपले अन्नदाते असल्याचा बहुदा केंद्र सरकारला विसर पडला आहे. बाहेरच्या देशातील लोकांना आंदोलनाबाबत बोलू नका, असे सांगण्याआधी सेलिब्रिटींनी स्वत: बोलते झाले पाहिजे. तुम्हाला कोणी अडवलेय? इतके दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. हा देशाचा अंतर्गत प्रश्न आहे, हे बरोबर आहे. त्यावर आधी तुम्ही बोलते व्हा आणि मग इतरांना अडवा. शेतकऱ्यांच्या बाजूने उभे रहा,” असे आवाहन ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले.
नाशिक येथील साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांची भेट घेतल्यानंतर भुजबळ गुुरुवारी (दि.४) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद आणि शिवसेनेकडे विधानसभेचे अध्यक्षपद याबाबत केवळ चर्चा आहे. ज्यावेळी चर्चा थांबेल, तेव्हाच खरे ते काय बाहेर येईल. कविता राऊत यांच्याबाबत राज्यपाल म्हणाले ते योग्य आहे. राऊत यांना काही कागदपत्रांची पूर्तता करायची होती. ती त्या करत आहेत.
धनंजय मुंडे प्रकरणावर भाष्य करताना भुजबळ म्हणाले, “मुंडे यांच्या विरोधात पुन्हा तक्रार करण्यात आली आहे. पण या आधीदेखील जी तक्रार देण्यात आली होती, ती पुन्हा मागे घेण्यात आली. त्या महिलेच्या विरोधातच अनेकांनी तक्रारी दिल्या.”
चौकट
शर्जिल चुकलाच पण...
“शर्जिल उस्मानीने हिंदू समाजाबाबत वापरलेले शब्द चुकीचे होते. आम्हीही मनुवादाविरुद्ध बोलतो. पण याचा अर्थ कोणाच्या भावना दुखावणे असा होत नाही,” असे छगन भुजबळ म्हणाले. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावर मुख्यमंत्र्यांना कोणीही भेटू शकते, असे ते म्हणाले. ‘ते पक्षात येणार का,’ हे मुनगंटीवारांना विचारा, असा चिमटा त्यांनी काढला.