बारामती : बँकेत तारण ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन रिक्षाने जाणाऱ्या महिलेची पर्स पळविणाऱ्या परप्रांतीय महिलांना रिक्षाचालक तरुणाने पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या ताब्यात दिले. जवळपास २२ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज त्यांच्याकडून मिळाल्याने या महिलेचा जीवदेखील भांड्यात पडला. या महिलांचा पाठलाग करून त्यांना ऐवजासह पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या तरुणाला पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी ५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.आरोपी महिला कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील आहेत. शांता सिद्दाप्पा वडारी, संगीता सिद्दाप्पा वडारी अशी या आरोपी महिलांची नावे आहेत. दोघी सवती-सवती आहेत. त्यांना अनुक्रमे ७ आणि ९ महिन्यांची मुले आहेत. आज सायंकाळी बारामती-नीरा मार्गावर हा प्रकार घडला. फिर्यादी महिला रंजना सावंत (रा. म्हसोबानगर, नीरा रोड, बारामती) यांनी फलटणच्या बँकेतून तारण ठेवलेले सोन्याचे दागिने, त्यामध्ये बांगड्या, अंगठी, पाटल्यांसह २२ तोळ्यांचा ऐवज होता, हे दागिने पर्समध्ये ठेवले होते. बारामतीत उतरल्यानंतर रिक्षातून म्हसोबानगरला जाण्यासाठी त्या निघाल्या. याचदरम्यान लहान मुले बरोबर असलेल्या दोन महिलांनी नजर चुकवून त्यांची दागिन्यांची पर्स लंपास केली. मात्र, हा प्रकार त्यांच्या लगेच लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा केल्याने रिक्षाचालक अंकुर देवकाते याने दागिने घेऊन पळत असलेल्या महिलांचा पाठलाग करून त्यांना पकडले व पोलिसांना कळविले. त्यांच्या ताब्यातील दागिन्यांची पर्स मिळाली. रिक्षात या मुलांना खेळविण्याचा बहाणा करून रंजना सावंत यांची नजर त्यांनी चुकविली. या संदर्भात पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले, की रिक्षाचालक अंकुर देवकाते याने प्रसंगावधान राखून आरोपी महिलांचा पाठलाग करून पकडल्याने मुद्देमाल जसा आहे तसा मिळाला. (प्रतिनिधी)
बारामतीत दागिने चोरणाऱ्या महिलांंना अटक
By admin | Updated: July 14, 2015 03:09 IST