Baramati bypoll election 2026: 'एकच वादा अजितदादा', घोषणा हवेतच विरल्या, देशात मताधिक्क्याच्या ‘रेकाॅर्डब्रेक’ नंतर बारामतीत नीरव शांतता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 12:01 IST2026-05-05T11:58:24+5:302026-05-05T12:01:45+5:30

Baramati bypoll election 2026 सोशल मिडीयावर अनेकांनी केवळ दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र ठेवून त्याखाली ‘बारामती माझा श्वास कधीच थांबणार नाही’ असे नमुद करीत सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले

Baramati bypoll election 2026 Only one controversy Ajitdada slogans disappear into thin air, after the 'record-breaking' vote share in the country, there is eerie silence in Baramati | Baramati bypoll election 2026: 'एकच वादा अजितदादा', घोषणा हवेतच विरल्या, देशात मताधिक्क्याच्या ‘रेकाॅर्डब्रेक’ नंतर बारामतीत नीरव शांतता

Baramati bypoll election 2026: 'एकच वादा अजितदादा', घोषणा हवेतच विरल्या, देशात मताधिक्क्याच्या ‘रेकाॅर्डब्रेक’ नंतर बारामतीत नीरव शांतता

बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मिळालेल्या ‘रेकाॅर्डब्रेक’ मताधिक्क्याने एैतिहासिक ठरली. पवार यांच्या या अनोख्या एैतिहासिक विजयामुळे सोमवारी(दि ४) बारामती विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण देशात चर्चा झाली.मात्र, हा जल्लोष साजरा झालाच नाही.

बारामतीचे नाव देशाच्या राजकीय पटलावर ठळकपणे नोंदले गेले. मात्र, आपल्या लाडक्या नेत्याच्या अकाली ‘एक`झीट’ने शोकमग्न असणारे बारामतीकर अद्याप देखील सावरलेले नाहीत. त्यामुळे बारामतीत प्रत्येक निवडणुकीत जेसीबीने गुलाल उधळुन होणारा जल्लोष यंदा रंगलाच नाही. एकच वादा अजितदादा, या बारामतीकरांच्या घोषणा आज हवेतच विरल्या. उपमुख्यमंत्री पवार यांच्याप्रमाणेच देशात सर्वाधिक मतांनी बारामतीचे लोकप्रतिनिधी विजयी होण्याचा मान बारामतीच्या मतदारांना देखील मिळाला आहे. उपमुख्यमंत्री पवार यांना देशात विक्रमी मताधिक्क्य मिळवुन देणारे बारामतीकर आज कमालीचे शांत दिसून आले.

सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली. निवडणुक एकतर्फी असल्याने बारामतीकरांना विजयाबाबत खात्री होती. मात्र, बारामतीकरांना आज मताधिक्क्याचा विक्रम घडविण्याच्या सोनेरी क्षणांचा साक्षीदार होण्याची उत्कंठा होती. त्यामुळे मतमाेजणी सुरु झाल्यापासून पहिल्या फेरीपासून २४ व्या फेरीपर्यंतच्या जाहिर होणाऱ्या प्रत्येक निकालावर बारामतीकर लक्ष ठेवून होते. २४ व्या फेरीअखेर विक्रमी मताधिक्क्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर देखील बारामतीकर जल्लोषापासून दुरच राहिले. सोशल मिडीयावर अनेकांनी केवळ दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र ठेवून त्याखाली ‘बारामती माझा श्वास कधीच थांबणार नाही’ असे नमुद करीत सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन केले. काहींनी सुनेत्रा पवार यांचे अजित पवार यांच्या समवेत चे फोटो सोशल मिडीयावर ठेवत मुक आनंद व्यक्त केला.

सुनेत्रा पवार - बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मला भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल तमाम मायबाप बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार. आपण दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. अजितदादांच्या पश्चात झालेली बारामतीची ही पहिलीच निवडणूक होती. त्यांच्या मार्गदर्शनाची आणि त्यांच्या उपस्थितीची उणीव आज प्रकर्षाने जाणवते. हा विजय माझ्यासाठी केवळ राजकीय यश नसून, आदरणीय दादांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना दिलेली खरी आदरांजली आहे. अजितदादांनी महाराष्ट्रासाठी आणि बारामतीसाठी केलेले कार्य, त्यांची जनतेशी असलेली नाळ आणि विकासाची त्यांची दृष्टी आजही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. त्यांचे विचार आणि संस्कारच मला पुढे जाण्याची ताकद देत आहेत. शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेचा वारसा जपत, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय अजितदादांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा माझा निर्धार कायम राहील. हा विजय म्हणजे त्यांच्या स्वप्नांना आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आहे, याची मला पूर्ण जाणीव असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमुद केले.


खासदार सुप्रिया सुळे - अजितदादांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत विक्रमी मतांनी विजयी झाल्याबद्दल सुनेत्रावहिनी पवार यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. या निवडणुकीला दादांच्या आठवणींची किनार होती. बारामतीच्या जनतेने वहिनींना विधानसभेत पाठविताना दादांवरील आपले प्रेम प्रकट केले आहे. त्यांचे हे प्रेम आम्हा सर्वांसाठी अनमोल ठेवा आहे.बारामतीच्या जनतेने वहिनींना विधिमंडळात पाठवून त्यांच्यासाठी काम करण्याची संधी प्रदान केली याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

जय पवार - “बारामतीकरांनी ही निवडणूक मनावर घेतली होती. दादांच्या प्रेमाखातर नागरिकांनी दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. “दादांशिवाय निवडणूक लढवावी लागेल, असे कधी वाटले नव्हते. पण नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. आज जरी आनंदाचा क्षण असला, तरी काही दिवसांपूर्वी भोर तालुक्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे आम्हाला जल्लोष करावासा वाटत नाही.” त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्टपणे आवाहन केले की, कुठल्याही प्रकारचा जल्लोष करू नये. तसेच सुनेत्रा पवार यांनीही संबंधित पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, हीच भूमिका घेतल्याचे त्यांनी नमूद केले. हा विजय एका व्यक्तीचा नसून संपूर्ण टीमच्या मेहनतीचा आहे. पोलिंग एजंट्स, पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदार या सर्वांनी एकत्रितपणे काम केले. लोकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहणार आहोत,” असे ते म्हणाले.

आमदार रोहित पवार - बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी निवडून आल्याबद्दल सुनेत्राकाकींचं मनःपूर्वक अभिनंदन! हा विजय म्हणजे अपेक्षेप्रमाणे बारामतीकरांनी दाखवून दिलेलं अजितदादांवरील प्रेम आणि त्यांना कृतज्ञतेने वाहिलेली आदरांजली आहे.या विराट विजयाबद्दल समस्त बारामतीकर मतदारांचेही मनापासून आभार.

युगेंद्र पवार - आजच्या विधानसभा पेाटनिवडणुकीत विक्रमी विजय मिळविल्याबद्दल सुनेत्राकाकी यांचे मनपुर्वक अभिनंदन .स्व.अजितदादांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आणि बारामतीच्या मतदारांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सुनेत्राकाकी निश्चितपणे कार्य करतीज,असा विश्वास आहे.

Web Title: Baramati bypoll election 2026 Only one controversy Ajitdada slogans disappear into thin air, after the 'record-breaking' vote share in the country, there is eerie silence in Baramati