लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : द्राक्ष निर्यातदारांना बांगलादेशात द्राक्षे पोहोचवण्यासाठी रेल्वेची आवश्यकता आहे. त्यासाठी नाशिकमधील द्राक्ष बागायतदार व बांगला देशातील व्यापाऱ्यांमध्ये नुकतीच संयुक्त चर्चा झाली असून आता भारतीय रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर यासंदर्भात बैठक होणार आहे.
बांगलादेशात सध्या भारतातून भाजीपाल्यासाठी रेल्वे जाते, मात्र ती आठवड्यातून फक्त दोनच दिवस आहे. द्राक्ष बागायतदारांना ती रोज हवी आहे. बांगलादेशात द्राक्ष हंगामात ३० ते ४० हजार टन द्राक्ष जातात. बहुतेक द्राक्षे नाशिक जिल्ह्यातील आहेत. सध्या नाशिकची द्राक्षे कोलकात्याहून रस्तेमार्गे बांगलादेशात पाठवली जातात. यात नाशिकमधील व्यापाऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळेच नाशिकमधील व्यापाऱ्यांनी थेट रेल्वे उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.
राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे पदाधिकारी कैलास भोसले यांनी सांगितले की, नाशकातले व्यापारी व बांगलादेशातील व्यापाऱ्यांची याबाबत नुकतीच एक बैठक झाली. आता रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली जाणार आहे. याच हंगामात द्राक्षासाठी रेल्वे मिळावी, असा प्रयत्न आहे. कृषी निर्यात सल्लागार गोविंद हांडे यांनी सांगितले की, केंद्र सरकार यासाठी प्रयत्न करत आहे. अशी रेल्वे सुरू झाल्यास द्राक्ष उत्पादकांचा फायदाच आहे. सुरुवातीला द्राक्षे व त्यानंतर केळी व अन्य फळांच्या निर्यातीसाठीही याचा चांगला उपयोग होऊ शकतो.