सुनील राऊत, पुणेसुमारे १६१ उद्याने, ५०८ एकर जागा... कर्मचारी मात्र अवघे २८५. त्यातील जवळपास ५० ते ६० कर्मचारी दररोज सुटीवर... ही अवस्था आहे पुणे महापालिकेच्या उद्यान विभागाची. गेल्या काही वर्षांपासून बंगळुरूपाठोपाठ देशात सर्वाधिक उद्याने असलेले शहर म्हणून पुणे विकसित होत असले, तरी, या उद्यानांच्या दैनंदिन देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी महापालिकेकडे मनुष्यबळच नसल्याने या उद्यानांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. परिणामी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली अनेक उद्याने केवळ कागदवरच राहिली असून, त्या ठिकाणी केवळ मैदानेच असल्याचा भास व्हावा, अशी अवस्था झाली आहे. तर या कर्मचाऱ्यांकडे केवळ उद्यानांचीच जबाबदारी नाही तर, शहरातील रस्ता दुभाजक आणि वाहतूक बेटांचीही जबाबदारी असल्याने उद्यानांकडे दुर्लक्ष होत आहे.गरज ९६१ कर्मचाऱ्यांची! गेल्या दशकापासून शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यामुळे केवळ ६० ते ७० असलेल्या उद्यानांची संख्या तब्बल १६१ च्या घरात पोहोचली आहे. गार्डन अॅन्ड पार्कच्या निकषांनुसार, उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीच्या एक एकर क्षेत्रासाठी दोन मजुरांची आवश्यकता असते. तर रस्त्यावरील दुभाजक आणि वाहतूक बेटांसाठी १ हजार चौरस मीटर क्षेत्रासाठी एक मजूर आवश्यक असतो. पण महापालिकेच्या उद्यान विभागाचा विस्तार पाहता अवघे २५ टक्केच मनुष्यबळ पालिकेकडे आहे. निकषांनुसार, महापालिकेस उद्यानांसाठी ९६१ कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात २८५ कर्मचारीच आहेत. त्यातील अनेक कर्मचारी निवृत्तीच्या मार्गावर असून, नव्या सेवा नियमावलीनुसार, ही रिक्त पदे भरणे अशक्य आहे. त्यामुळे उद्यान विभागास ठेकेदार स्वरूपात कर्मचारी भरावे लागतात.ठेकेदार नेमूनही संख्याबळ अपुरेच महापालिकेकडे उपलब्ध असलेली कर्मचारी संख्या पाहता, पालिकेस आणखी ६७६ कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असल्याने उद्यान विभागास अंदाजपत्रकात दिलेल्या निधीतून केवळ २०० ते २५० कर्मचारी घेता येतात. त्यामुळे दरदिवशी जवळपास आणखी ४५० कर्मचाऱ्यांची गरज उद्यान विभागास भासते. एवढ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची झाल्यास पालिकेच्या अंदाजपत्रकात मोठी तरतूद करणे आवश्यक आहे. मात्र, ती होताना दिसत नाही. उद्यानांच्या निर्मितीसाठी आणि विकासासाठी पुढाकार घेतला जातो. मात्र, त्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे उद्यानांची दुरवस्था होते. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
१६१ उद्यानांचा ‘भार’ २८५ जणांवरच
By admin | Updated: May 16, 2015 04:34 IST