Tunisha Sharma: मेकअप करताना स्टोरी शेअर केली; मग शूटिंग सुरु असताना आत्महत्या, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 07:20 PM2022-12-24T19:20:02+5:302022-12-24T19:40:30+5:30

Tunisha Sharma: सोनी सब चॅनेलवरील अलिबाबा दास्ताने काबुल या सिरीयलमधील मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत होती.

हिंदी सिरीयलची प्रसिद्ध अभिनेत्री तुनीषा शर्मा (२४) हिने शनिवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास कोणत्यातरी कारणावरून नायगावच्या रामदेव स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

सोनी सब चॅनेलवरील अलिबाबा दास्ताने काबुल या सिरीयलमधील मुख्य अभिनेत्री म्हणून काम करत होती. तिच्या या आत्महत्येमूळे सिरीयल क्षेत्रात खळबळ व शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ती शनिवारी सिरीयलच्या सेटवर आली होती. पण ती सेटवर दिसली नाही. नंतर तिच्या सहकाऱ्यांनी तिला बोलावण्यासाठी गेले व दरवाजा ठोठावला. पण तिने दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडण्यात आला. तिने पंख्याला गळफास घेतल्याचे पाहून सर्व सहकाऱ्यांना धक्का बसला. तिला उपचारासाठी जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले पण तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

सेटवर मेकअप करत असतानाची स्टोरी तुनिषाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही स्टोरी आत्महत्येच्या काही वेळ आधी तुनिषाने शेअर केली होती. त्यानंतर याच मालिकेचं शूटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्येच तिने गळफास घेतल्याची माहिती समोर येत आहे.

तुनीषा शर्माचे कोणत्या अभिनेत्यासोबत अफेअर किंवा काही वाद झाल्याचे सूत्रांकडून कळते. तिने आत्महत्या का केली व कोणत्या कारणामुळे याचा वालीव पोलीस तपास करत असल्याचे उपायुक्त सुहास बावचे यांनी लोकमतला सांगितले.

तुनिषा शर्माचा जन्म ४ जानेवारी २००२ रोजी चंदीगडमध्ये झाला. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. अवघ्या १४व्या वर्षी तिची भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप या मालिकेसाठी निवड झाली होती.

या मालिकेत तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती. त्याच वर्षी तिने चक्रवर्ती अशोक सम्राट या टीव्ही मालिकेत राजकुमारी अहंकाराची भूमिकाही साकारली होती. त्यानंतर तिने गब्बर पुंचवाला आणि शेर-ए-पंजाब: महाराजा रणजीत सिंग या चित्रपटात भूमिका केल्या.