1 / 9Sri Lanka Crisis : श्रीलंकेने बुधवारी सांगितले की, पेट्रोलने भरलेले जहाज जवळपास दोन महिन्यांपासून किनाऱ्यावर उभे आहे, परंतु त्याच्याकडे पैसे देण्यासाठी परकीय चलन नाही. तर दुसरीकडे श्रीलंकेने आपल्या नागरिकांना या इंधनासाठी 'रांगेत उभे राहून वाट पाहू नका' असे आवाहनही केले आहे.2 / 9दरम्यान, श्रीलंकेकडे डिझेलचा मात्र पुरेसा साठा असल्याची माहिती श्रीलंकेच्या सरकारनं सांगितलं. २८ मार्चपासून श्रीलंकाई समुद्री क्षेत्रात पेट्रोलनं भरलेलं एक जहाज उभं आहे, अशी वीज आणि ऊर्जा मंत्री कंचना विजेसेकरा यांनी दिल्याचं ऑनलाइन पोर्टल न्यूजफर्स्ट डॉट एलके नं सांगितलं. याशिवाय त्यांनी देशात पेट्रोलची समस्या असल्याचंही म्हटलं.3 / 9“पेट्रोलने भरलेल्या जहाजासाठी पैसे देण्यासाठी आमच्याकडे अमेरिकन डॉलर नाहीत. याव्यतिरिक्त, त्याच जहाजावर जानेवारी २०२२ मध्ये मागील खेपेसाठी आणखी ५.३ कोटी डॉलर्स देणे बाकी आहे. संबंधित शिपिंग कंपनीने दोन्ही देयके पूर्ण होईपर्यंत जहाज सोडण्यास नकार दिला आहे,” असे विजेसेकरा यांनी सांगितले.4 / 9“याच कारणामुळे आम्ही लोकांना रांगेत उभे राहू नका असे सांगितले आहे. डिझेलबाबत कोणतीही समस्या नाही. परंतु पेट्रोलसाठी लाईनमध्ये उभे राहू नका. आमच्याकडे पेट्रोलचा मर्यादित साठा आहे आणि तो अत्यावश्यक सेवा, प्रामुख्यानं अॅम्ब्युलन्ससाठी वितरित करण्याचे प्रयत्न करत आहोत,” असेही ते म्हणाले.5 / 9सर्व पंपांवर पेट्रोलचं वितरण पूर्ण करण्यासाठी शुक्रवारपासून तीन दिवस लागतील. जून २०२२ साठी श्रीलंकेला ५३ कोटी डॉलर्सची आवश्यकता आहे, असंही विजेसेकरा यांनी सांगितलं.6 / 9भलेही देशाला भारतीय कर्जाच्या सुविधेचा फायदा मिळतो, तरी त्यांना दोन वर्षापूर्वीच्या प्रति महिना १५ कोटी डॉलर्सच्या तुलनेत इंधनाच्या खरेदीसाठी ५० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक रकमेची आवश्यकता आहे. मागील खेपेसाठीही श्रीलंकेला ७० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक रकमेची आवश्यकता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 7 / 9देशाला जागतिक बँकेकडून १६ कोटी डॉलर्सची मदत मिळाली आहे. आर्थिक संकटामुळे देशात इंधन आणि गॅसचा तुटवडा आणि त्याविरोधात सुरू असलेले आंदोलन पाहता या आर्थिक मदतीचा काही भाग इंधन खरेदीसाठी वापरण्यासाठी चौकशी केली जात आहे, असे श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी बुधवारी संसदेत सांगितले.8 / 9जागतिक बँकेकडून १६ कोटी डॉलर मिळाले आहेत. आशियाई विकास बँकेकडून (ADB) अनुदान मिळण्याची शक्यता आहे, असे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सांगितले. तसेच, जागतिक बँकेकडून मिळालेल्या पैशांचा वापर इंधन खरेदीसाठी केला जाऊ शकत नाही. मात्र आम्ही त्यातील काही हिस्सा इंधन खरेदीसाठी वापरता येईल का, यासंबंधी चौकशी करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.9 / 9देशभरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपावर नो पेट्रोलचे बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काही तासांत देशातील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. पेट्रोल मिळेल या आशेने नागरिकांनी अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लावल्या आहेत. यासोबतच महागाईसह देशात अन्नधान्य़ाचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.