1 / 9२ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला. या नोटा बदलून घेण्यास अथवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 2 / 9८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या होत्या. त्यावेळीही नोटा बदलून घेण्यास वेळ दिला होता. यावेळी २ हजारांच्या नोटेच्या बाबतीत मात्र नोटा थेट बंद न करता ही नोट ३० सप्टेंबरपर्यंत चलनात कायम ठेवली आहे.3 / 9२ हजारांच्या नोटा वितरणातून मागे घेतल्या असल्या तरी त्याची कायदेशीर वैधता कायम राहणार आहे. परंतु ज्यांच्याकडे बँक अकाऊंट नाही त्यांनी काय करावं? नोट कुठे बदलावी? ३० सप्टेंबरपर्यंत बदलता आली नाही तर काय? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत.4 / 9RBI नं क्लीन नोट पॉलिसी अंतर्गत २ हजार रुपयांची नोट चलनातून बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयनं लोकांना नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वेळ दिली आहे. २३ मे ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत लोक बँकेत जाऊन २००० रुपयांच्या नोटा बदलू शकतील.5 / 9काही लोकांचं बँकेत खातं नाही. अशा लोकांनी काय करावं? हा प्रश्न त्यांच्यासमोर असेल. २००० रुपयांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत चलनात राहतील, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. ज्यांच्याकडे सध्या २ हजार रुपयांच्या नोटा आहेत त्या त्यांना खर्च करता येतील. याशिवाय बँकांना तात्काळ प्रभावानं ग्राहकांना २ हजारांच्या नोटा जारी करू नये असंही सांगण्यात आलंय.6 / 9ज्यांचं स्वतःचं बँकेत खातं नाही, ते देशातील कोणत्याही शाखेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकतात. ज्यांचं खातं नाही तेदेखील एकावेळी २ हजार रुपयांच्या १० नोटा म्हणजेच २० हजार रुपये मूल्याच्या नोटा बदलू शकतात. दरम्यान, दिलेली ३० सप्टेंबरची मुदत संपल्यानंतर पुढे काय होणार याबाबत मात्र रिझर्व्ह बँकेनं कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यासाठी रिझर्व्ह बँक कोणता निर्णय घेतंय याची वाट पाहावी लागेल.7 / 9२ हजारांच्या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. बँका ग्राहकांना ही सुविधा मोफत देणार आहेत. बँकांकडून ही सेवा पूर्णपणे मोफत असेल. तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही.8 / 9बँकांना ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी नोटा बदलून देण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. यासाठी व्यवस्था करण्याच्या सूचना आरबीआयनं बँक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यासाठी बँकेकडून सुविधा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. याबाबतचे चित्र सध्या तरी स्पष्ट झालेलं नाही.9 / 9बँकेनं नोट स्वीकारण्यास नकार दिल्यास, तुम्ही तक्रार दाखल करू शकता. बँकेनं २ हजारांची नोट स्वीकारण्यास नकार दिल्यास, ती व्यक्ती प्रथम बँक व्यवस्थापनाकडे तक्रार करू शकते. ३० दिवसांच्या आत बँकेकडून प्रतिसाद न मिळाल्यास, रिझर्व्ह बँक cms.rbi.org.in या RBI च्या तक्रार व्यवस्थापन पोर्टलवर रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजना 2021 अंतर्गत तक्रार करू शकते.