शहरात दररोज १४ केंद्रांवर लसीकरण केले जाते. मात्र, गुरुवारी तसेच शुक्रवारी लसीकरण मोहिमेवर परिणाम झाला. गुरुवारी दुपारी काही केंद्रांवर लसीकरणाची वेळ दुपारी २ ते ६ होती. यात बाल विद्यामंदिर येथे दुपारी ४ वाजेपर्यंत लसच मिळाली नसल्याचे काही लाभार्थींनी सांगितले, तर गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मनपाच्या आरोग्य विभागाकडे शुक्रवारी होणाऱ्या लसीकरणाचे किती डोस मिळणार हे उपलब्ध झाले नव्हते. यामुळे अचानक शुक्रवारी सकाळी १४ केंद्रांएवजी केवळ ५ ठिकाणी मोहीम राबविली जाणार असल्याचे कळविले. यामध्ये जायकवाडी, खानापूर, इनायतनगर, बाल विद्यामंदिर व अन्य एका ठिकाणी लसीकरण होणार असल्याचे मनपाने सांगितले. प्रत्यक्षात सकाळी ९ ते ५ या वेळेत होणाऱ्या लसीकरणाच्या वेळेमध्ये दुपारी १ वाजेपर्यंत बाल विद्यामंदिर येथे लसच आली नव्हती. यामुळे केंद्रावर जवळपास ६० ते ७० लाभार्थी ताटकळत बसले होते. दुपारी १ नंतर लस येण्याची शक्यता होती. शहरात दररोजच लसीकरणाचा खेळखंडोबा होत असल्याचे दिसून येत आहे.
ऑनलाइन नोंदणी झालेल्यांनाच मिळाली लस
अनेकजण गुरुवारी लस मिळाली नाही म्हणून ठरावीक केंद्रांवर आले. मात्र, शुक्रवारी केवळ ऑनलाइन नोंदणी झालेल्यांनाच लस देण्यात आली. यामुळे टोकन घेणारे किंवा स्पाॅट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्यांचा हिरमोड झाला.
लसींचा पुरवठा राज्यस्तरावरून कमी होत असल्याने उशीर झाला. तसेच लसीकरण केंद्रांची संख्या कमी करून नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी काही केंद्र सुरू ठेवले. मुळात लसीकरण बंद ठेवण्याचे आदेश होते. - डाॅ. कल्पना सावंत, वैद्यकीय अधिकारी, मनपा