कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्या सुविद्य पत्नी उषाताई ढवण यांच्या हस्ते वडाच्या झाडाचे पूजन करुन आणि कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्या हस्ते वडाच्या झाडास राखी बांधून उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. डॉ. ढवण म्हणाले, पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड व संवर्धनाचा वसा विद्यापीठाने घेतला असून तीन वर्षाच्या कार्यकाळात विद्यापीठ अंतर्गत मराठवाड्यातील महाविद्यालये, संशोधन केंद्रे व कृषी विज्ञान केंद्र परिसरात साधारणत: १० लाख वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. परभणीतील विद्यापीठ परिसरात पाचशे पेक्षा जास्त वडाच्या झाडांची लागवड केल्याचे त्यांनी सांगितले.
मल्हारीकांत देशमुख म्हणाले, कोरोना काळात प्राणवायूचे मानवी जीवनातील महत्व अधोरेखित झाले आहे. या प्राणवायूची पूर्तता वृक्षांपासूनच होते. त्यामुळे प्राणवायू देणाऱ्या आणि मानवाचे रक्षण करणाऱ्या या झाडांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येकाने कर्तव्य भावनेतून या उपक्रमात सहभाग नोंदविला तर वृक्षलागवड चळवळ सार्थकी ठरेल, असे ते म्हणाले. याप्रसंगी वृक्षप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.