परभणी : कोरोना संसर्गाच्या काळामध्ये रुग्णांना दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकांची सेवा घेताना रुग्णांची वारेमाप लूट होत असल्याचे शुक्रवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले.
‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक असताना अशी बंधने फारशी पाळली जात नसल्याचे दिसून येत आहे. उलट जास्तीत जास्त लूट कशी करता येईल, याकडे रुग्णवाहिका मालकांचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे. शासनाने खासगी रुग्णवाहिकांसाठी कुठलेही दर निश्चित न केल्याने कोरोना रुग्णांची वारेमाप लूट होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी केलेल्या पाहणीत शासकीय रुग्णालयातून कोरोनाचा रुग्ण बसस्थानक परिसरातील १ किमी अंतरावरील खासगी रुग्णालयात पोहचविण्यासाठी दीड ते दोन हजार रुपये भाडे आकारल्याचे दिसून आले.
शासकीय रुग्णालय
शासकीय रुग्णालयातील कोरोना सेंटरमधील रुग्ण बसस्थानक परिसरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यासाठी दोन ऑक्सिजन असलेल्या खासगी रुग्णवाहिका चालकास दुपारी १ वाजेच्या सुमारास विचारणा केली.
तेव्हा एका रुग्णवाहिका चालकाने एक ते दीड हजार रुपये तर दुसऱ्याने दीड ते दोन हजार रुपये एक किमी अंतरावरील असलेल्या खासगी दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी भाडे घेण्यात येईल, असे म्हटले. त्यामुळे या वारेमाप लुटीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
परभणी शहरातील बसस्थानक परिसरात असलेल्या डॉक्टरलेन भागातील एका खासगी दवाखान्यातून आयटीआय परिसरातील कोरोना सेंटरमध्ये रुग्ण दाखल करण्यासाठी एका ऑक्सिजन असलेल्या रुग्णवाहिका चालकास शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास विचारणा केली तेव्हा कमीत कमी १२०० रुपये भाडे आकारले जाईल, असे सांगितले.