विद्यापीठातील पुलाची दुरवस्था
परभणी :वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून लोहगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाची दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूचे कठडे तुटले असून, पुलावरील रस्त्यावरही जागोजागी खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी याभागात प्रकाश व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.या पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
रस्ता निर्मितीचे काम संथगतीने
परभणी : येथील गंगाखेड रस्त्याच्या निर्मितीचे काम संथगतीने सुरू आहे. सध्या एका बाजूने काम पूर्ण झाले असले तरी दुसऱ्या बाजूचे काम शिल्लक आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरील पुलाची अनेक कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. गंगाखेड- परभणी हा वर्दळीचा रस्ता असून, लातूर, अंबाजोगाई, परळी या भागातून नांदेडकडे जाणारी वाहने याच मार्गाने धावतात. रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
प्लास्टीक मुक्ती मोहिमेला प्रतिसाद
परभणी : ग्रामीण भागात प्लास्टीक मुक्तीची मोहीम जिल्हा परिषद प्रशासनाने हाती घेतली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गावा-गावात प्लास्टीक कचरा संकलित केला जात आहे. स्वच्छता अभियानाबरोबरच आता प्लास्टीक मुक्ती मोहीमही हाती घेण्यात आल्याने ग्रामीण भागात स्वच्छतेची चळवळ वाढविली जात आहे. शहरी भागात मात्र या मोहिमेला अजूनही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे.
खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी
परभणी : परभणी ते पेडगाव या रस्त्यावर जागोजागी खड्डे झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. वाहनधारकांना खड्डे चुकवत वाहने चालवावी लागत आहेत. खड्ड्यांमुळे २२ कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागत आहे, राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत असलेला हा रस्ता दुरुस्त करावा, अशी वाहनधारकांची मागणी आहे.
रबी पीक कर्जाचे वाटप ठप्पच
परभणी : जिल्ह्यातील बँकांनी पीक कर्ज वाटपासाठी आखडता हात घेतला आहे. त्यामुळे यावर्षीही रबीच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट पूर्ण झाले नाही. विशेष म्हणजे मागील आठवड्यात पालकमंत्री नवाब मलीक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत रबी पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दोन आठवड्यात पूर्ण करण्याच्या सूचना बँक प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र अद्यापही कर्ज वाटपाला गती मिळालेली नाही.