दैठणा : परभणी तालुक्यातील दैठणा येथील बीएसएनएल कार्यालयातील ऑपरेटर गेल्या सहा महिन्यांपासून गायब झाला आहे. त्यामुळे दैठणा व परिसरातील बीएसएनएलची सेवा विस्कळीत झाल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे.
दैठणा गावामध्ये बीएसएनएलची इमारत आहे. या ठिकाणावरून अनेक गावाला भ्रमणध्वनीची सेवा पुरविली जाते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून ऑपरेटर येत नसल्यामुळे ग्राहकांना सुरळीत सेवा मिळणे अवघडझाले आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्यांकडे ग्राहकांनी तक्रारी केल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सहा महिन्यांपासून बिलाचे वाटप झाले नसल्यामुळे अनेक ग्राहकांचे भ्रमणध्वनी बंद पडले आहेत. त्यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वरिष्ठांनी याची दखल घेऊन तत्काळ ऑपरेटरची नियुक्ती करून ग्राहकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी दैठणा परिसरातील ग्राहकांमधून केली जात आहे. परंतु, वरिष्ठ अधिकार्यांना याचे देणे-घेणेच नसल्याचे दिसून येत आहे. /(वार्ताहर)
■ सहा महिन्यांपासून ऑपरेटर कार्यालयात येत नसल्यामुळे एका खाजगी महिला कर्मचार्यावरच कारभार हाकला जात आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत असून, अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचे सोयरसूतक बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकार्यांना नसल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
■ बीएसएनएल व अन्य कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. आपले ग्राहक वाढावेत म्हणून ग्राहकांना सुरळीत सेवा दिली जात आहे. परंतु, ग्राहकांची सर्वाधिक पसंती ही बीएसएनएल कंपनीला आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे नाईलाजास्तव ग्राहक अन्य कंपन्यांकडे वळले आहेत. हेतुपुरस्सर बीएसएनएलचे अधिकारी असे वागतात की काय, असा प्रश्न निर्माण होतो.